त्रिशुंड गणपती मंदिर
तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे नागझरीच्या काठी आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत.
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे.
हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते. गर्भगृहाच्याही दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून वर नक्षीदार कमान आहे. त्याच्यावर तीन शिलालेख कोरलेले आहेत. पैकी दोन संस्कृतात असून एक फारसी भाषेत कोरलेला आहे. पहिल्या शिलालेखात मंदिराच्या स्थापनेचा काल व रामेश्वराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसर्या शिलालेखात गीतेतील नमनाचा श्लोक कोरलेला आहे तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असलेले नमूद केले आहे.
नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा, विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात. एकमुख, तीन सोंडा आणि सहा हात अशीरचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू, अंकुश आदी आयुधे आहेत.
मूर्तीच्या पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे.
मंदिराला शिखर नसल्याने बर्याच काळपर्यंत हे तसे दुर्ल़क्षितच होते. शिखराच्या जागी स्वर्गमंडपासारखे सपाट वर्तुळाकार छत आहे. पण हल्ली मंदिराची चांगली निगा राखली जातेय.
गणेशाचे दर्शन घेऊन मी आणि अत्रुप्त आत्मा बाहेर पडलो ते आता पुढच्या टप्प्यात पुण्यातली अशीच काही दुर्लक्षित पण शिल्पसमृद्ध मंदिरे बघण्याचे मनावर घेऊनच.
माहीती आभार : अन्तरजाल ✍
Comments
Post a Comment