श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे
पुण्याच्या इतिहासात डोकावले तर पुण्याची मूळ वस्ती कसबा पेठेच्या भागात होती. 'कस्ब' या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला असून त्याचा अर्थ होतो कारागिरी. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवते. शुभकार्याची पहिली अक्षत ठेवण्याची येथे परंपरा आहे. अगदी 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे झालेल्या मंगलकार्याची अक्षत येथे ठेवली गेली होती. कधीकाळी 'गोविंदाग्रज' म्हणजेच राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिल्यावर कसबा गणपतीसमोर ठेवून प्रार्थना केली होती. त्यांचा राहता वाडा येथून जवळच असलेल्या पिंपळाच्या पारासमोर होता. कसबा गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा रूढ आहेत. आज आपण या प्रसिद्ध गणपतीबद्दल जाणून घेऊयात.
कसबा गणपती म्हटलं की राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांचा मंदिराशी आलेला संबंध आपणास दिसतो. आदिलशाहीत पुणे शहाजीराजांकडे जहागिरी होती. जिजाऊ महाराज व शिवराय पुण्यात असताना मंदिर बांधले गेले. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लालमहालात शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे वास्तव्य होते. आपल्याला इतिहासात एका अस्सल पत्रात उल्लेख मिळतो की, 'पुणे परगण्याचा कर्यात मावळातील माण तर्फेच्या गावातून रोज द्यावे', असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला होता. हे पत्र आहे. अर्धा शेर तेल वजनी हे नंदादीपासाठी कसब्यातील मोरयाच्या देवस्थानास १९ मार्च १६४७ सालचं.
परंतु त्याहीपेक्षा जुना उल्लेख निजामशाहीतील एका द्वैभाषिक फर्मानात आहे. त्या पत्रात निजामशहाने या देवस्थानच्या मोरेश्वरास दिवाबत्ती, शेंदूर यासाठी इनाम दिले होते. त्यानुसार हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासून अस्तित्वात होते असे दिसते. पत्रात फारसी मजकूर असून या फर्मानाची तारीख १ जानेवारी १६१९ ही आहे. विष्णूभट महादेवभट पुराणिक (ठकार) हे या गणपतीचे खिजमतगार (सेवेकरी) ब्राह्मण असून देवासाठी इनाम दिल्याची नोंद मिळते. या पत्रात १६१३-१४ सालचा उल्लेख आहे. त्यावरून इ.स. १६१४ पासून हा गणपती अस्तित्वात होता असे म्हणता येईल. या पत्रांचे वाचन दोन ज्येष्ठ इतिहासकारांनी केले होते. कै. निनाद बेडेकर यांनी श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या मदतीने पूर्ण केले. शिवकाळापासून ठकार घराण्याकडे मंदिराची व्यवस्था वंशपरंपरेने आहे. त्यांची १८ वी पिढी गजानन चरणी आपली सेवा अर्पण करत आहे. कसबा गणपतीचा ‘जयती गजानन’' असाही उल्लेख सापडतो. ज्याच्या आशीर्वादाने जय किंवा यशप्राप्ती होते तो 'जयती गजानन'.
वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना हे मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपती म्हटलं की आपल्याला तो हात, पाय, सोंड अशा मूर्तिरूपात समोर येतो. परंतु कसबा गणपती हा तांदळा रूपात आहे. तांदळा म्हणजे अवयवरहित व आकाररहित देव. हा तांदळा आधी लहान होता, शेंदूर लावून तो मोठा झाला आहे असे म्हणतात. पाच फूट उंचीच्या या तांदळ्याच्या डोळ्यांमध्ये हिरे व नाभिमध्ये माणके ही रत्ने बसविली आहे. गाभाऱ्याबाहेर शिवलिंग, दत्त व विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती दिसतात. मंदिरास लाकडी सभामंडप आहे. त्या मागे दीपमाळ, छोटे मारुती मंदिर व समाधी आहे. सभामंडपात कमानीदार महिरपींसह खांबांवर अष्टविनायकांच्या तसबिरी लावल्या आहेत. मंदिराचा दर्शनी भाग दुमजली दिसतो. त्यातील दुसऱ्या मजल्यावर नगारखाना असल्याचे समजते. लाकडी सभामंडपाच्या उजव्या बाजूस ओवऱ्या आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर जी चांदीची महिरप दिसते ती रावबहाद्दर गणपतराव महादेव केंजळे यांनी नवसपूर्ती करताना अर्पण केली आहे. केंजळे 'नवा पूल' किंवा 'छत्रपती शिवाजी महाराज पूल' किंवा 'लॉइड ब्रिज'या पुलाच्या बांधकामाच्या वेळेस कॉन्ट्रॅक्टर होते. हा पूल बांधताना अडचणींचा सामना करावा लागल्याने त्यांनी कसबा गणपतीस नवस बोलला होता, असे मंदिराचे विश्वस्त ठकार सांगतात. गाभाऱ्यातही चांदीची महिरप पाहायला मिळते. वर्षातून तीन वेळा ज्येष्ठ, भाद्रपद व माघ महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी असा गणेशजन्म साजरे केले जातात. उत्सवात गणपतीपुढे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष प्रसंगी गजाननास सालंकृत पोशाख पूजा केली जाते. मंदिरात रोज रात्री मोरया गोसावी यांची पदे गायली जातात.
ढेरे, ठकार, कानडे, वैद्य, शाळीग्राम, कवलंगे, निलंगे व भाराईत हे आठ जण या प्राचीन कसबा पेठेचे वसाहतदार होते. ही आठ घराणी म्हणजेच आठघरे विजापूरच्या इंडी तालुक्यातून राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून पुण्यात आली होती. गॅझेटिअरप्रमाणे या आठघरेंनी मंदिरापुढची जागा बांधली. गजाननराव सदाशिव दीक्षित यांनी लाकडी सभामंडप बांधला. तसेच लकडे कुटुंबीयांनी फरसबंदी बांधकाम व ओवऱ्या बांधल्या. १८७७ मध्ये मंदिराच्या आवारात पाण्याचा हौद बांधला होता. फेब्रुवारी २००७ मध्ये मंदिरापासून जवळ असलेल्या मोळावडे यांच्या जागेत नवीन इमारतीचे बांधकाम चालू असताना जुनी झिजलेली गणेशमूर्ती सापडली होती. कसबा गणपतीची मूळ मूर्ती हीच असावी का याबद्दल मात्र काही ठाम सांगता येत नाही. तर असे हे पुणेकरांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लाभलेले ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर.
सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Location :
Instagram :
खूप चांगली माहिती.
ReplyDeleteअतिशय सुंदर माहिती मिळाली 🙏🏻
ReplyDelete