गणपतीला दुर्वा का आवडतो ?
अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक प्रकारे अग्नीचेच रूप होता. त्याला गिळून टाकल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली आणि त्याचा गणपतीला खूप त्रास होऊ लागला. आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळून टाकले आणि तो स्वतःच त्रासात सापडला, हे समजल्यानंतर देव, ऋषी, मुनी या सर्वाना त्यांना जमतील ते उपचार सुरु केले. कुठूनतरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरु झाले.
वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र त्याचा मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याचा सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण छे, कशाचाच उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह तसाच होत राहिला.
गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वाची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या व कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. आणि काय आश्चर्य, दुर्वाकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे.
म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
माहिती आभार : अन्तरजाल 🙏
Comments
Post a Comment