सारसबाग , पुणे
शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरात असूनही जिचे आकर्षण आजतागायत कायम आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावले जिथे पडतात, ती म्हणजे सारसबाग. पुण्याच्या इतिहासप्रसिद्ध ठिकाणांमध्ये सारसबागेला पुण्याची शान म्हटल्यास नक्कीच ते वावगे ठरणार नाही.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले. पेशवे दप्तरातील नोंदींनुसार "पर्वतीच्या तळ्यातील गणपती म्हणजेच सारसबाग" असा उल्लेख सारसबागेबाबत आढळतो. येथील गणरायाची मूर्ती विलोभनीय असून, गेली अनेक वर्षे येथे साग्रसंगीत पूर्जाअर्चा, उपासना केली जात आहे. पुणेकरांच्या दोन ते तीन पिढ्यांच्या आठवणी सारसबागेशी जोडलेल्या आहेत. आज शहरात सुमारे २०० ते ३०० बागा असल्या तरीही सारसबागेविषयी असणारा जिव्हाळा आणि आकर्षण टिकून आहे.
Comments
Post a Comment