धोम धरण, धोम (सातारा ) महाबळेश्वर येथूनच कोयनेच्या बरोबरीने उगम पावलेली कृष्णा नदी पूर्वेकडे दरीत झेपावते आणि वाईच्या दिशेने मार्गक्रमण करते. या वाईजवळ धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध पावलेल्या धोम गावाजवळ धोम धरण बांधलेले आहे. सन १९७८ मध्ये हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे कृष्णेवरील पहिले धरण होय. या धरणाची पाणी साठवण क्षमता १४ टीएमसी असून या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. वाई , सातारा , जावळी , कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांना या सिंचनाचा लाभ होतो. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात. धोम येथील श्री नरसिंहांचे मंदिर व सिद्धेश्वर मंदिर पाहण्याजोगे आहे. Instagram ID : @travelwala.chora