आपण राहतो ते गाव किती जुने आहे हे प्रत्येक गावकऱ्याने माहिती करून घेतलेच पाहिजे , कारण त्या गावाचा वारसा आपण पिढ्यान्पिढ्या जपतो. जसे एखाद्या देवळात गेल्यावर क्षेत्रमाहात्म्य सांगितले जाते आणि ते आपण भक्तिभावाने ऐकतो , तसेच आपले गाव हे आपल्याच नव्हे , तर आपल्या पूर्वजांचेही कार्यक्षेत्रच. त्या क्षेत्राचा महिमा , त्याचे महत्त्व आणि माहात्म्य आपणालाच माहिती नसेल तर येणाऱ्या पिढ्यांना काय समजणार. म्हणूनच ज्या पुण्यात आपण राहतो , त्या पुण्याची , पुण्याच्या इतिहासाची थोडी माहिती करून घेणे आवश्यक आहे . त्रिखंडात गाजलेले पुणे , जरी पेशव्यांच्या काळापासून भरभराटीला आले असले , तरी पुण्याला प्राचीन इतिहासाचे अधिष्ठान आहे . या इतिहासाची पूर्वपीठिका अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून आहे. काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या परिसरात नदीच्या पात्रात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली , तेव्हा पुण्यात आदिमानवांची वस्ती असावी असा तर्क गृहीत धरून शोध घेण्यास सुरुवात झाली . पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कोरेगावातही अश्मयुगीन हत्यारे व साधने सापडली. काळ्या नक्षीमध्ये रंगवलेल्या चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे तिथे आढळले . शिवाय भांडी , बरण्या अशा वस्तूही सापडल्या. प्रवरा नदीकाठच्या नेवासे आणि बोरवे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तूंशी त्यांचे विलक्षण साम्य होते . एवढेच नव्हे , तर पुण्याच्या आजूबाजूला विशेषत : पंढरपूरनजीक भीमा नदीच्या काठच्या इटे या ठिकाणीही असेच अवशेष आढळले . यामुळे पुणे , कोरेगाव , इटे या ठिकाणी एकाच नदीच्या तीरावर समान संस्कृती नांदत असावी या तर्काला आधार मिळतो.
प्राचीन काळानंतरचे पुण्याच्या संस्कृतीचे पुरावे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील बौद्धकालीन अवशेषांमुळे दृढ होतात . या काळात बौद्ध धर्माचा प्रसार दक्षिणेत , विशेषत : महाराष्ट्रात , मोठ्या प्रमाणावर होत होता याला अन्य पुरावे आहेतच , तथापि पुण्याच्या परिसरातही त्यांनी खोदलेली लेणी आजही अस्तित्वात आहेत . सिम्बॉयसिसच्या टेकडीवरील गोखले स्मारकाच्या खालच्या बाजूस पांडवनगरमध्ये लेणेसदृष एक गुहा आहे . सध्या तिचे महादेव मंदिरात रूपांतर झाले आहे . परंतु ते बौद्धांचे खोदकाम आहे हे नीट बघणाऱ्याला समजेल . कालें , भाजे , शेलारवाडी , सासवड , पुरंदर या पुण्याच्या परिसरातही अशी बौद्ध लेणी आढळतात . पूर्वीच्या भांबवड्याजवळ म्हणजेच नंतरच्या भांबुरड्याजवळ आणि सध्याच्या शिवाजीनगरमधील भर वस्तीत जंगलीमहाराज समाधीपलीकडील पाताळेश्वर लेणे पुण्यातील प्राचीन वस्तीचा उपलब्ध पुरावा म्हणून मानता येईल . पुणे ते जुन्नर असा रस्ता होता आणि दळणवळणही होते असे या लेण्यांच्या ठिकाणावरून लक्षात येते . त्यामुळे पुणे हे मध्यवर्ती स्थानक असावे यात शंका वाटत नाही. पुण्यातील कसबा पेठेत , कसबा गणपती ते सात तोटी चौक या परिसरात चार ठिकाणी इमारतीचे पाये खणताना मातीच्या विटा , मडकी , भांडी , मणी इत्यादी गोष्टी सापडल्या . संशोधकांच्या मते त्या चौथ्या शतकातील आहेत . म्हणजेच , पुण्याची प्राचीनता ज्ञात इतिहासापेक्षा आणखी मागे जाते . इ.स. ४६५ मध्ये त्रैकूटक राजांच्या अमलाचा एक पुरावा सापडला आहे , तो म्हणजे पुण्याजवळच्या इंदापूर तालुक्यात कझाद या गावात , या राजांची काही नाणी सापडली . त्यामुळे पुण्यावर त्रैकूटकांची सत्ता होती असे म्हणता येते . सर्वांत जवळचा लिखित स्वरूपातील उपलब्ध पुरावा मात्र शके ६८० ( इ.स .७५८ ) या काळातील राष्ट्रकूट राजवटीतील ताम्रपटाचा आहे . पूगडी भट या ब्राह्मणास राष्ट्रकूट सम्राट कृष्ण याने बोपखल हे गाव , अश्विन अमावस्येच्या सूर्यग्रहणाचे दिवशी ( हेमंलबी संवत्सर ) इनाम दिले असा या ताम्रपटाचा अर्थ आहे . त्यात पुण्यविषयान्तर्गत बोपरखळुग्राम : यस्य पूर्वतो कलस :। दक्षिणत : नदी मूईला । पश्चिमत : दर्पपूडिका । उत्त ( र ) तो भेऊसरी ग्रामः । असा मजकूर असून पुण्याचा उल्लेख पुण्य - विषय असा स्पष्ट केला आहे . विषय याचा अर्थ आजच्या परिभाषेतील तालुका असे मानता येईल . यात उल्लेखलेली ठिकाणे आजही तशीच असून नावे फक्त रूपांतर होत किंवा अपभ्रंश होत बदलत गेली आहेत . तथापि ( कलस :) कळस , ( मुईला ) मुळा , ( दर्पपूडिका ) दापोडी , ( भेऊसरी ) भोसरी असे त्यांचे आजचे उल्लेख या ताम्रपटातली माहिती खरी आहे हे सांगण्यास पुरेसे आहेत.
नंतरच्या काळातील म्हणजेच शके ९ १५ ( इ. स. ९९३ ) मधील एक ताम्रपटही उपलब्ध आहे . शिलाहार राजांच्या राजवटीतील ' अपराजित ' राजाने क - हाडहून आलेला ब्राह्मण पूणक - विषयातील खेटक गावात राहत होता असेही त्यात म्हटलेले आहे . खेटक म्हणजे खेड ( राजगुरूनगर ) आणि पूणक म्हणजे पुण्य , पुणे , वैकूटक , राष्ट्रकूट , चालुक्य , शिलाहार अशा विविध राजवटी बदलत बदलत ११ व्या शतकात पुणे यादव राजांच्या आधिपत्याखाली आले . यादवसम्राट राजा रामचंद्र देव याचा पंतप्रधान हेमाद्री पंडित ऊर्फ हेमाडपंत याने प्रचलित केलेल्या बांधकाम शैलीतली अनेक देवळे महाराष्ट्रभर पसरली होती . त्यांतीलच एक म्हणजे पुण्यातील नागेश्वर मंदिर . सध्याचे बांधकाम हे पेशवेकालीन जीर्णोद्धारातले असले तरी नागेश्वर मंदिराचे उल्लेख प्राचीन काळापासून म्हणजेच तेराव्या शतकापासूनच होताना आढळतात . इ.स. १२ ९ ४ मध्ये दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाने दक्षिणेवर स्वारी करून , यादव साम्राज्य जिंकले . देवगिरी राजधानीचे दौलताबाद झाले . त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्राचा सर्वच प्रदेश अमलाखाली घेत , इसवीसनाच्या चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यावर मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला . पुण्याच्या परिसराचे पाच भाग होते . माळीची जमीन , मुजेरीची जमीन आणि पुणेवाडीची वस्ती आणि कुंभारी व कासारी या दोन कारागिरांच्या वस्त्या . त्यांना मोहतर्फा असे म्हणत .
या सर्वाच्या एकत्रीकरणातून पुणे नावाचे काहीसे मोठे गाव अस्तित्वात आल . या सर्व इतिहासातून एक गोष्ट लक्षात येते की , पुण्याला प्राचीन अधिष्ठान असले तरी ऐतिहासिक , सामाजिक , धार्मिक किंवा सांस्कृतिक कोणतेही महत्त्व नव्हते . या परिसरातले ते एक मोठे गाव होते , एवढेच . त्यामुळे आजूबाजूची चार गावे तसे पुणे होते , असे म्हणणेच योग्य ठरेल . आज या जुन्या पुण्याचे अवशेष शिल्लक नाहीत , परंतु एक गोष्ट मात्र अभिमानास्पद आहे ती म्हणजे , या ठिकाणी वस्ती करून राहणारी घराणी मात्र अजूनही वास्तव्यात आहेत . माळीचे पाटील ' लडकत ' , पुणेवाडीचे पाटील झांबरे , कुलकर्णी - राजषों , देशमुख - शितोळे , देशपांडे - होनप , सर्वांनीच आपल्या रूपाने पुण्यनगरीचा प्राचीन वारसा आत्मीयतेने जपला आहे , हेही नसे थोडके . पुण्यात या काळाच्या आधीपासून वास्तव्य असणारी आठ प्राचीन घराणी आहेत . ढेरे , शाळीग्राम , कानडे , वैद्य , कवलंगे , निलंगे आणि भाराईत अशी ती घराणी . यांपैकी कवलंगे , निलंगे आणि भाराईत यांचे वंश चालले नाहीत , त्यांचे उत्पन्न अनुक्रमे राजर्षी , धर्माधिकारी आणि माळी ( यांना ओतूरकर असेही नाव आहे ) यांच्याकडे वहिवाटीसाठी आले . या घराण्यांना ' आठघरे ' असे उपनाव आहे.
कसबा पेठेत मुजुमदार बोळात वैद्य यांचा वाडा होता . वैद्यांचे वारस अजूनही आठघरे वैद्य ' असे नाव चालवितात . साधारणत : सोळाव्या शतकापासून पुढील काळात महाराष्ट्रातील गावांच्या प्रतवारीचे निश्चित पुरावे आढळतात . त्यानुसार , मजरा म्हणजे अगदी लहान गाव किंवा छोटी वस्ती , मौजा म्हणजे त्यापेक्षा जरा मोठ्या वस्तीचे गाव , कसबा म्हणजे तालुक्याचे मुख्य व मोठे तालेवार गाव आणि शहर म्हणजे राजधानी किंवा त्या दर्जाचे गाव , अशा चार प्रतीत तत्कालीन गावे विभागली जात . मजरा व मौजा गावांसाठी आठवड्यातील एका वारी बाजार भरे . बाकी कारभार बलुत्यांच्या हातात होता . मात्र , कसबा गावाशेजारी एक किंवा जास्त कायमस्वरूपी बाजारपेठा वसवलेल्या होत्या व प्रत्येक बाजारपेठेत एका वारी आठवड्याचा बाजार भरे . शहराची बातच न्यारी . अनेक बाजारपेठा , राजवाडे , थोरामोठ्यांचे वाडे , हवेल्या , प्रशस्त रस्ते असे त्यांचे स्वरूप असे . भाग्याची गोष्ट म्हणजे , पुणे या सर्व प्रतवारीमधून , प्रगती करत करत १८ व्या शतकातील एक समृद्ध शहर झाले . १६ व्या शतकाअखेरीपर्यंत पुण्याला मौजा हाच दर्जा होता . सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे कसबा झाले . आजूबाजूला तीन कायमस्वरूपी बाजारपेठाही वसल्या आणि एकोणिसाव्या शतकाचे प्रारंभी पुणे , अठरा बाजारपेठा असलेले भरभराटलेले महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपाला आले होते.
सन्दर्भ :
- हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोवनी )
Comments
Post a Comment