अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
महादजी शिंदे यांच्या कार्यकतृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला.
त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना म्हणजे पानीपतचे युद्ध होय. या युद्धात ते स्वत: हजर होते त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे बंधु तुकोजी व पुतणे जनकोजी शिंदे ठार झाले. पूर्ण शिंदेशाही पथकाचा नाश होऊन मराठ्यांचा पराभव झाला व या युद्धातुन त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन ते परत फिरले. वाटेत त्यांच्यावर प्राणांकीत हल्ला झाला. त्यातून वाचून ते सुखरूप परत दक्षिणेत आले.
आधीच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्युचे दुःख, त्यात ते एकटेच कर्तृत्वान पुरूष उरले. त्यामुळे सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यात पेशवे कुटुंबातील संघर्षाचा फटका महादजीस बसला व त्यांच्या दौलती विषयी वाद सुरू झाला. त्यात त्यांची महत्वाची सात वर्ष गेली. तरिही त्यांनी न डगमगता धिराने या दरम्यान स्वत:चे बस्तान बसविले.
उज्जैन येथील जहागिरदारीची व्यवस्था लावून सैन्य उभारले पैसा वसुल केला व मल्हारराव होळकरांच्या साथीने उत्तरेतील मराठ्यांची स्थिती सुधारण्याचा प्राथमिक प्रयत्न करून स्वत: अस्तित्व दाखवून इतरांस दखल घेण्यास भाग पाडले. यामुळे त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत दाखबिलेली धैर्य मानसिकता यामुन त्यांचे कार्यकतृत्व शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे भारताच्या मध्ययुगीन इतिहासात चमकते .
महादजी शिंदे यांनी हिंदुस्थानात कार्य करित असतांना मराठेशाहीच्या हिताबरोबरच आपला स्वाभिमान व वैभव सांभाळले. स्पर्धेत टिकण्यासाठी धन, संपत्ती, हत्यारे, सैन्य, प्रभावळ व जहागिरी कायम अबाधित ठेवली, कारण साम्राज्य निर्मितीसाठी या सर्व गोष्टीची आवश्यकता होती.
महादजी शिंदे यांनी शहाजीराजे, छ. शिवाजी महाराज व शाहू यांच्या प्रमाणे अखील हिंदुस्थानातील मराठ्यांचे महत्व जाणले व मराठ्यांच्या सहकार्याशिवाय दिल्लीची मोगलशाही सत्ता टिकू शकत नाही, हे महादजी शिंदे यांनी ओळखले. त्याच प्रमाणे महादजींना स्वत:च्या कार्यकर्तृत्वाची जाण होती आणि त्याच्या बळावरच त्यांनी पेशवे, इंग्रज, फ्रेंच, मोगल, राजपूत, जाट व शिख दरबारात वर्चस्व प्रस्तापित करून पूर्ण हिंदुस्थानात पुनः मराठ्यांचा दरारा निर्माण करून मराठ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.
- मराठ्यांच्या इतिहासातील महादजी शिंदे यांचे योगदान
साभार : मराठा रियासत
Comments
Post a Comment