नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ), मेणवली ( वाई ) / Nana Fadnavis Wada ( Menavali Wada ), Menavali ( Wai )
नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा )
वाई पासून जवळ ३.५ किमी अंतरावर मेणवली गाव वसले आहे. इथेच नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) हा राजमान्य राजश्री नाना फडणवीसांनी १७७० च्या दशकात बांधला. याबरोबर त्यांनी वाड्याच्या पाठी कृष्णा काठी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधल. इथेच महादेवाचे आणि विष्णूचे (मेणवलेश्वर) मंदिर बांधले. मेणवलेश्वर आणि वाड्याच्या भिंती भित्तिचित्रांनी अलंकृत केले. मेणवली हे गाव भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना इनाम मिळाले होते.
हा वाडा जवळपास ३४६०२ चौरस फूट इतक्या जागेवर पसरलेला आहे. दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून तीन दिशांना बुरुज आहेत. वाड्याच्या उत्तर पश्चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत. वाड्याच्या पूर्व बाजूने मुख्य प्रवेश आहे आणि त्याचा दरवाजा उत्तराभिमुख आहे. इथेच नगारखाना आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार वाड्याच्या मागच्या बाजूला नदीघाटावर उघडते. वाड्यात एकूण ६ चौक आणि जवळपास २०० लहानमोठे खन आहेत. बांधकाम करताना काळ्या पाषाणातले भक्कम जोते उभारून त्यावर लाकडी खांब आणि तुळ्याची चौकट उभारली आहे. तसेच पुडाच्या भिंती बांधून त्यावर चुन्याचे काम केले आहे. भित्तिचित्रे, तक्तपोशी, सुरूचे खांब आणि नक्षीदार कमान यांच्या रूपात इथे मराठाकालीन कलेचे काही उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात.
वाड्याच्या प्रवेश द्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरात बान्धलेली विहीर आहे. या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे सायफन पद्धतीने वाड्यात नेले होते असे म्हणतात. या वाड्यात नाना फडणवीसांचे केव्हा आणि किती दिवस वात्सव्य होते याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि वाड्याचे बांधकाम झाल्यांनतर काही महीने इ.स. १७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली मध्ये होता. सन १८०० मध्ये नानांचा देहांत झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी जिऊबाई यांनी या वाड्यात वास्तव्य केले. आज हा वाडा त्यांच्या वंशजांची म्हणजेच फडणीस-मेणवलीकर कुटुंबीयांची खाजगी मालमत्ता आहे.
‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.' - असे सातारा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले. ( माहिती आभार : अभिषेक यादव 🙏 )
Comments
Post a Comment