भूत लेणी, मानमोडी डोंगर ( टेकडी ) - जुन्नर ( पुणे )
जुन्नर भागातील मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूत लेणी समूह. अंबा-अंबिका लेणी समूह पाहून झाल्यावर डावीकडे एक पायवाट गर्द झाडीत जाते. सुमारे १५ मिनिटांत ही पायवाट आपल्याला भूत लेणी समुहाकडे घेऊन येते.
लांबून दिसणारी शिल्पे, मोठी मधाची पोळी आणि मधमाशांच्या आवाज यांनी प्रथमदर्शनीच वातावरण गंभीर बनवते. भूत लेणी समूह हा १६ बौद्ध लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे.
लेणे क्र. ३७ - इथे बाहेर एक पोढी , पाण्याचे टाके आढळते, त्यावर एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे, त्याचा अर्थ, " कुमीय यांची कन्या सुलसा हिने या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले " असा आहे.
लेणे क्र. ३८ - हा विहार असून, चौरस मंडप व दोन खोल्या आहेत. पुढे जमिनीत पाण्याची लहान टाकी कोरलेली आहेत.
लेणे क्र. ३९ - हा ही विहार असून ३ स्तंभ व २ अर्धस्तंभ असून, ५ अपूर्ण खोल्या आहेत. समोर पाण्याचे लहान टाके आहे.
लेणी क्र. ४० - खरंतर या लेणी समुहाकडे आल्यावर प्रथमदर्शनी आपले लक्ष वेधणारी ही प्रमुख लेणी, इथे चैत्यगृह आहे. समोर दर्शनी भाग ११ मीटर उंच आहे, तो खाली रुंद दरवाजा आणि वर तुटलेला गच्चीचा भाग असा दोन भागात विभागलेला आहे.
गच्चीच्या वर सुंदर, नक्षीदार चैत्य गवाक्ष आहे. अगदी वरच्या पट्टीत ७ सुंदर चैत्यकमानी कोरल्या आहेत. डाव्या कोपऱ्यात बोधिवृक्ष कोरलेला असून, त्यावर पुष्पमाला सजवलेल्या कोरलेल्या आहेत. तर उजव्या कोपऱ्यात कोरीवकाम अर्धवट सोडलेले दिसते. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंना ठळक मनुष्याकृती कोरलेल्या आहेत.
उजवीकडे गरुड तर डावीकडे शेषनागराज शिल्पे कोरलेली आहेत. खरतर गरुड अन् नाग एकमेकाचे शत्रू , तरीपण या चैत्यासमोर आपले वैर विसरून, त्याच्या रक्षणासाठी इथे उभे आहेत, हा त्याचा अर्थ. पूर्वी स्थानिक लोक यांना भुते समजत, त्यामुळे हा लेणी समूह आता भूत लेणी समूह म्हणून ओळखला जातो.
कमानीच्या खालील अर्धगोलास मण्याची झालर असून त्यात मध्यभागी गजलक्ष्मी सोबत कमळाच्या सात पाकळ्यावर सुंदर शिल्पे कोरली आहेत. इथे खाली चंद्रकोरीच्या आकारात शिलालेख कोरलेला आहे, त्याचा अर्थ, " यवन ( ग्रीक ) चंद्र याने गर्भद्वार दान दिले " असा आहे. आतमध्ये चैत्यगृह असून, याचा आलेख चापाकार असून, छत गजपृष्ठाकृती आहे. डाव्या बाजूस ४ अष्टकोनी स्तंभ असून, सर्वात मागे स्तूप असून, त्यावर हार्मिका नाही. या लेण्याची निर्मिती इस पहिल्या शतकातील असल्याचे इतिहास अभ्यासकांनी नोंद केली आहे.
सन्दर्भ :
- लेणी महाराष्ट्राची
- जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी
- हेमंत वडके 🤘
Comments
Post a Comment