रास्ते वाडा, सोमवार पेठ ( पुणे )
दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशनकडे जाताना थोडे पुढे गेल्यावर समोरच एक भव्य वाडा दिसतो. हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तेथपासून अपोलो टॉकीजच्या चौकापर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील प्रमुख सरदार आनंदराव रास्ते यांचा हा वाडा. सध्या वाड्याच्या दर्शनी भागात तळमजल्यावर काही दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शाळेची पाटी दिसते.
पेशवाई जाऊन शतके उलटली, सरंजामतनखा जाऊनही दशके उलटली. त्यामुळे रास्ते सरदारांच्या वंशजांना बदलत्या काळाबरोबर बदलणे भाग पडले. साहजिकच त्यांनी वाड्याच्या दक्षिणेकडील बाजूस म्हणजे अपोलोकडून के.ई.एम. कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस ओनरशिप फ्लॅट उठविले. पुणे शहराच्या पूर्व भागातील या वाड्याला पूर्वीच्या काळी आंबील ओढा वळवून पाणीपुरवठा केलेला होता. वाड्याच्या आत सरदार रास्त्यांनी बांधलेले श्रीरामाचे सुरेख देऊळ आहे. हाच ' रास्त्यांचा राम '.
वाड्याप्रमाणेच रास्ते घराण्याचा इतिहासही पाहण्यासारखा आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई हिचे माहेर रास्ते घराण्यातले. विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही त्यांची तीन मुले. त्यापैकी थोरले विश्वासराव १७६१ च्या पानिपतच्या संग्रामात गोळी लागून ठार झाले व त्यांचे चुलते सदाशिवरावभाऊ हेही गारद झाले. २३ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशवे यांनी ' भाऊ भाऊ ' असे म्हणत पर्वतीवर प्राण सोडल्यावर माधवराव पेशवाईची वस्त्रे मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षापासून राक्षसभुवनच्या लढाईपर्यंत माधवराव मातोश्री गोपिकाबाईंच्या सल्ल्याने निर्णय घेत. परंतु राजकारणाचा एकंदर आवाका आल्यावर ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले. तडफदार, निःस्पृह व निःस्वार्थी माधवरावांचे काही निर्णय अर्थातच कठोर होते. असाच एक निर्णय त्यांच्या मातुल घराण्याविषयी असल्याने माता पुत्रात कायमचे वितुष्ट आले.
त्याचे असे झाले, की निजामाचा बंदोबस्त करण्याच्या कामी सरदार रास्त्यांनी कुचराई करून पेशव्यांच्या हुकमाचा भंग केला. इतकेच नव्हे, तर मल्हारराव रास्ते दादासाहेबांच्या, म्हणजे राघोबादादांच्या पक्षास मिळाले. म्हणून माधवराव पेशव्यांची त्यांच्यावर इतराजी होऊन त्यांनी सरदार रास्ते यांचा सरंजाम जप्त केला. ही गोष्ट गोपिकाबाईंना मुळीच रुचली नाही म्हणून त्यांनी माधवरावाकडे रदबदली करून निर्णय मागे घेण्यास सुचविले. निग्रही माधवरावांनी कठोरपणे निर्णय कायम ठेवला. त्यामुळे खुद्द आपल्या चिरंजीवावर रुष्ट होऊन गोपिकाबाई नाशिकजवळील गंगापूर येथे जाऊन राहू लागल्या. पुण्यास परत येण्याविषयी चिरंजीव माधवरावांनी, तसेच नाना फडणीसांनी अनेकदा आर्जवे केली; परंतु बाई पुण्यास परत आल्या नाहीत. १७७१ मध्ये माधवरावांची प्रकृती क्षयाने ढासळल्याने एकदाच त्या प्रकृती पाहण्यासाठी आल्या होत्या असे दिसते. त्यांनी पुत्रावरील आपला राग व हेका शेवटपर्यंत सोडला नाही. करारी आई आणि कर्तव्यकठोर चिरंजीव असे इतिहासातील हे एकमेव उदाहरण !
सन्दर्भ :
- पुण्यातील वाडे आणि वास्तू ( डॉ. एच. वाय. कुलकर्णी )

Instagram : TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment