Skip to main content

सुधागड / Sudhagad


सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व

सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.


एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. महाराजांच्या मृत्यूनंतर सुधागड पुन्हा एकदा मोगलांच्या ताब्यात गेला. शेवटी सबनीस नारो मुकुंद यांनी १६८० मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला.


दक्षिणेत ठाण मांडून बसलेला औरंगजेब जेंव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली. नारो मुकुंद यांचे सुपुत्र शंकरजी नारायण यांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला. छत्रपती राजाराम महाराजांनी शंकरजी नारायण याला पंतसचिव केले. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजांच्या काळात पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.


रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो. याव्यतिरिक्त गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. पाच्छापूर हे पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे. राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या राजद्रोहींना संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले होते.


सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

माहिती आभार : राहुल जाधव

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...