सदर पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा आशय कळून येतो. पण लेखकांच्या 'वास्तव' शब्दाचा अर्थ आत्ता 'विस्तव' म्हणून घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण काही समाजकंटकांकडून सारखा हा विस्तव भडकवला जात आहे.
इतिहास अशी गोष्ट आहे, जिथे 'ध चा मा' झाला तरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते. म्हणून तत्कालीन कागदपत्रे, शिलालेख, झालेला पत्रव्यवहार यांवरच इतिहास अभ्यासला जातो. पण वाईट गोष्ट अशी की, असा इतिहास अभ्यासणाऱ्याला सध्या फक्त ट्रोल केले जाते. आपले अज्ञान आणि असत्याचा प्रोपोगंडा हीच याची कारणे देता येतील.
कोरेगाव भीमा, भीमा नदीच्या काठावर असलेले एक खेडे म्हणून या गावाला 'कोरेगाव भीमा' नाव मिळाले. पुढे याच गावच्या हद्दीत एक चकमक झाली, त्याला लढाई संबोधले गेले. ही लढाई होती मराठा विरुद्ध इंग्रज... इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतल्यानंतरही फक्त मराठे त्यांना विरोध करत होते, हे सर्वश्रुत आहे. पण मराठ्यांमधील अंतर्गत वादात इंग्रजांनी मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने हळू हळू मराठी सत्ता खिळखिळी करून टाकली. अशीच एक कोरेगावची लढाई.
३१ डिसेंबर १८१७ रोजी मराठा गादीचे वंशज छत्रपती प्रतापसिंह, दुसरे बाजीराव पेशवे व त्यांचे जवळपास २८००० सैन्य इंग्रजांनी बळकावलेले पुणे जिंकण्यासाठी निघाले असता, फुलगाव येथे मुक्कामी होते. तर पुण्याच्या रक्षणासाठी कर्नल बर्र याने शिरूर येथे असलेल्या कॅप्टन स्टाँटन या अधिकाऱ्याला ससैन्य बोलवून घ्यायला पत्र पाठवले होते. कॅप्टन स्टाँटनच्या सैन्यात ७७५ सैनिकांचा समावेश होता. त्यामध्ये सुन्नी, मुस्लिम, पठाण, बलोचि, ब्राम्हण, रजपूत, मराठा या सर्व जातीधर्मातील लोक होते. कोरेगाव भीमाजवळ मराठा आणि हे सैन्य एकमेकांच्या समोर आले असता कॅप्टन स्टाँटनला मराठा सैन्यासोबत लढण्यावाचून पर्याय उरला नाही, तर मराठा सैन्यालाही या सैन्याला मारल्याशिवाय पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसले.
१ जानेवारी १८१८ ला या दोन्ही सैन्यात चकमक झाली यात, दोन्हीकडून ७००-८०० सैनिक खर्ची पडले. मराठ्यांनी प्रतापसिंह छत्रपती सोबत असल्यामुळे त्यांच्या जिवाच्या काळजीने इंग्रजांना जास्तीची कुमक येण्याआधी साताऱ्याच्या दिशेने, तर कुमक न मिळाल्याने आणि बरेच नुकसान झाल्यामुळे कॅप्टन स्टाँटनने शिरूर च्या दिशेने आपले सैन्य हलवले. अशा प्रकारे ही लढाई अनिर्णायक ठरली. या पराक्रमाची याद म्हणून इंग्रजांनी मौजे पेरणे या गावात एक जयस्तंभ उभारला. ज्यावर इंग्रजांच्या बाजूने लढाईत लढलेल्या जखमी आणि मृत सर्व जातीच्या सैनिकांचा उल्लेख करण्यात आला. स्तंभाच्या संरक्षणासाठी याच लढाईत शौर्य गाजवलेल्या 'खंडोजी माळवदकर' यांना जमादार(इन-चार्ज) पदवी देऊन नेमणूक केली गेली.
पण काही वर्षांनी अचानकपणे जातीयवाद करण्यासाठी इतर कारणे देऊन, इंग्रजांनी अस्पृशांना सैन्यात भरती नाकारली. १९१७ मध्ये पहिली महार बटालियन उभारली, पण पहिले महायुद्ध झाल्यावर ती विसर्जित करण्यात आली. याआधी महार बटालियन नव्हती. १९४१मध्ये पुन्हा डॉ. बाबाहेबांच्या प्रयत्नांनी 'महार बटालियनची' स्थापना झाली.
ब्रिटिश सैन्याकडून लढलेल्या ३ लष्करी तुकड्यांतील सैनिकांची नावे आजही स्तंभावर आहेत. पुस्तकातही त्या तुकड्यांचा आणि नावांचा उल्लेख आहे. एवढंच काय तर संपूर्ण लढाईचा तपशील तत्कालीन पत्रव्यवहार, कागदपत्रे अशा संदर्भासह लेखकाने दिला आहे. शेवटी जाता जाता 'सिदनाक महार' यांच्याबद्दल केला गेलेला अपप्रचार आणि वास्तव देखील लेखकांनी मांडले आहे.
घटनेच्या मुळाशी गेले असता, पुराव्यांअंती असे लक्षात येते, आजही जाणीवपूर्वक बहुजन समाजाला दुसऱ्या समाजाविषयी भडकवण्यासाठी खोट्या इतिहासाचा प्रचार केला जात आहे. यातून सुशिक्षित बहुजन समाजाने तथ्य नसलेल्या खोट्या भाकडकथांवर विश्वास न ठेवता, बाकी समाजाला खरा इतिहास सांगून सामाजिक द्वेष कमी करण्यास व राष्ट्रउभारणीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे.
सत्य इतिहासाचे उपासक असलेल्यांनी आणि सुशिक्षित लोकांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक..!
पुस्तक - १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
लेखक - अॅड. रोहन बाळासाहेब जमादार (माळवदकर)
संकलन : आदित्य गरुड
Comments
Post a Comment