बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई शहराचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत चालविण्यात येत असे. १७९२ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार शहराचा कारभार गव्हर्नरांच्या हाती सोपविण्यात आला. गव्हर्नरांनी शहराच्या व्यवस्थेकरिता सात सदस्यांची एक समिती नेमून म्युनिसिपल फंडाची स्थापना केली. १८५८ मध्ये नगरपालिकेच्या घटनेमध्ये सुधारणा करून तीन आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. या आयुक्तांमध्ये दीनानाथ वेलकर हे एकमेव एतद्देशीय आयुक्त होते. नगरपालिकेच्या कार्यालयाकरिता गिरगाव रस्त्यावर एक इमारत भाड्याने घेण्यात आली. १८६५ मध्ये नगरपालिकेस स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला. सरकारने मुंबई नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ऑर्थर क्रॉफर्ड या मुलकी अधिकाऱ्याची नेमणूक करून दोनशे दंडाधिकाऱ्यांची नेमणूक केली. सुधारित घटनेनुसार आयुक्तांना अमर्याद अधिकार प्राप्त झाले.
गिरगाव रोडवरील नगरपालिकेच्या कार्यालयाचे स्थलांतर फोर्टमध्ये रॅम्पार्ट रोच्या पश्चिम टोकावर, फोर्बेज स्ट्रीटजवळ असलेल्या ' व्हिदम हाऊस ' या इमारतीत करण्यात आले. आयुक्त क्रॉफर्ड यांच्या कार्यकालात नगरपालिकेच्या सभा टाऊन हॉलमध्ये होत असत. नगरपालिकेचे कार्यक्षेत्र वाढल्यानंतर न्हिदम हाऊस मधील कार्यालय समोरच्या बाजूस असलेल्या ' आर्मी अॅन्ड नेव्ही स्टोअर्स ' या इमारतीत नेण्यात आले. १८९२ पर्यंत नगरपालिकेचा कारभार येथूनच होत असे. पालिकेच्या नियोजित इमारतीकरिता बोरीबंदरसमोर जागा घेण्यात आली. १९ डिसेंबर १८८४ रोजी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रिपन यांच्या हस्ते नव्या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला २५ जुलै १८८९ रोजी सुरवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर दोन रस्त्यांच्या बेचक्यात असलेल्या नगरपालिकेच्या भव्य इमारतीचे बांधकाम जुलै १८९३ मध्ये पूर्ण झाले.
या इमारतीचा आराखडा एफ. डब्लू. स्टिव्हन्स यांनी तयार केलेला आहे. या काळात स्टिव्हन्स सरकारी नोकरीत नव्हते. इंग्लंडमध्ये असलेल्या स्टिव्हन्स यांनी इमारतीचा आराखडा तयार करून पाठवला. इमारतीचे बांधकाम सुरु झाल्यावर मात्र मुंबईत येऊन बांधकामाची देखरेख केली. संपूर्ण इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी एतद्देशीय अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव यांनी पार पाडली. या इमारतीचे कंत्राटदार वेंकू बाळू कालेवार हे होते.
स्टिव्हन्स यांनी बोरीबंदरच्या इमारतीचेही बांधकाम केलेले आहे. मात्र महानगरपालिका व छत्रपती शिवाजी टर्मिनस या दोन्ही इमारतींमध्ये साम्य आढळत नाही. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत बांधण्यात आलेल्या बहुसंख्य शासकीय इमारतीत गॉथिक व भारतीय मिश्र शैलीचा वापर करण्याची पद्धत रूढ झाली होती. महानगरपालिकेच्या इमारतीत गॉथिक शैलीचा वापर कमी प्रमाणात केलेला असून इस्लामिक शैलीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. इटालियन गाँधिक व सारसैनिक या संमिश्र शैलीचा योजनाबद्ध वापर या इमारतीत करण्यात आल्याचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी म्हटलेले आहे. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी या शैलीचा उल्लेख सारसेनिक असा केलेला आहे. या दक्षिणाभिमुखी इमारतीचा भव्य घुमट दूरवरून उठून दिसतो.
या इमारतीच्या कमानीच्या प्रवेशद्वारावर गच्ची असून, गच्चीच्या दोन्ही कोपऱ्यात व्हेनेशियन शैलीतील, पंख असलेल्या सिंहांची " शिल्पे आहेत. या सिंहाच्या पंज्यामध्ये महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेली ढाल धरलेली आहे. या तीनमजली इमारतीची घुमटापर्यंत उंची दोनशे पस्तीस फूट असून घुमटाच्या भोवती असलेल्या गच्चीच्या कोपन्यावर लहान मिनार आहेत. तिसऱ्या मजल्यावर त्रिकोणी भागाच्यावर स्त्रीचा एक पुतळा असून या पुतळ्याच्या खाली महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. या इमारतीतील शिल्पे इंग्रज शिल्पकार हेमन यांनी लंडनमध्ये बनविलेली आहेत.
इमारतीवरील त्रिकोणी भागाच्या दोन्ही बाजूंस लहान घुमट असून घुमटाभोवती लहान मिनार आहेत. इमारतीच्या पूर्व व पश्चिम भागात असेच घुमट आहेत. या इमारतीच्या घुमट व मिनारांची शैली दख्खनमधील घुमट व मिनारांच्या सदृश आहे. याच पद्धतीचे घुमट व मिनार जालन्यातील जामा मशिदीवर व बिदर येथील सुलतान अली बिराद यांच्या दर्याच्या इमारतीवर आहेत ( Islamic Architecture of the Deccan - Page 24 ). पालिकेच्या मुख्य घुमटामध्ये पाण्याची मोठी टाकी असून येथील पाण्याच्या साहाय्याने इमारतीमध्ये नव्वद फुटांपर्यंत लिफ्ट चालवली जात असे . ( मुंबई वृत्तान्त पृष्ठ २४ ). या इमारतीच्या पश्चिमेकडे एक पोर्च असलेले प्रवेशद्वार आहे . येथून महानगरपालिकेच्या कार्यालयात जाण्याकरिता दगडी जिना आहे. या इमारतीत महानगरपालिकेची अनेक विभागीय कार्यालये आहेत. वरच्या मजल्यावर पालिकेचे मुख्य सभागृह आहे. या भव्य सभागृहाच्या खिडक्या स्टेनग्लासच्या आहेत. या इमारतीतील खिडक्या, कमानी व खांव गांथिक शैलीतील आहेत.
१९५० नंतर बृहन्मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या इमारतीचे विस्तारीकरण करण्यात आले. ही विस्तारित इमारत मुख्य इमारतीस जोडण्यात आली. मुख्य इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे. मुंबईचे महापौर, राजनीतिज्ञ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक पदे भूषविलेल्या फिरोजशहा मेहता यांचा मुंबईच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे.
१८६५ मध्ये ऑर्थर क्रॉफर्ड हे पालिकेचे आयुक्त होते. त्यांच्या कारकीर्दीत एतिहासिक ( १८६५-१८७१ ) मुंबई शहरातील नागरी विकासाचा पाया घातला गेला. क्रॉफर्ड यांच्या मनमानी कारभारामुळे महसुलापेक्षा वारेमाप खर्च झाला. तसेच त्यांनी अधिकाराचा गैरवापरही केला. त्यांच्या संदर्भात पालिकेत वादळी चर्चा झाली. क्रॉफर्ड यांनी पालिकासदस्य व सरकारची गैरमर्जी ओढवून घेतली. सरकारने त्यांना बडतर्फे केले. क्रॉफर्ड प्रकरणानंतर पालिकेच्या घटनेत आमूलाग्र बदल केले गेले.
१८७२ मध्ये सरकारने म्युनिसिपल बिल मंजूर करून नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा दिला. जुलै १८७३ मध्ये महानगरपालिकेची पहिली निवडणूक घेण्यात आली. महानगरपालिकेच्या एकूण ६४ सदस्यांपैकी १६ सदस्य सरकारनियुक्त असत. १६ सदस्य दंडाधिकाऱ्यांकडून ( जे.पी. ) निवडले जात असत. १८८३ मध्ये महिलांना निवडणूक लढविण्याचा हक्क मिळाला.
महानगरपालिकेच्या पहिल्या महिला सदस्य सरोजिनी नायडू, अवंतिकाबाई गोखले, व बचुबेन लोटवाला या होत्या . महानगरपालिकेची टप्प्याटप्प्याने बदलत गेलेली कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्थेतील घडत जाणाऱ्या विकासाची साक्षीदार आहेत. दादाभाई नौरोजी, दिनशा वाच्छा, विठ्ठलभाई पटेल, जमनादास मेहता, वि. ना. मंडलिक, का. त्रि. तेलंग, के. एफ नरिमन, अशा अनेक नामवंतांचा मुंबई नगरसंस्थेच्या सभासदांमध्ये समावेश होता. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची तड लावण्याकरता या सदस्यांनी घणाघाती, विद्वत्ताप्रचुर भाषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या या महानगराने भारतातील प्रथम श्रेणीचे शहर ( THE URBES PRIMA IN INDIA ) हे मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य सार्थ करून दाखवलेले आहे.
संदर्भ :
- सफर ऐतिहासिक मुंबईची ( संभाजी भोसले )
Comments
Post a Comment