तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे )
पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते. या सांस्कृतिक राजधानीचे जे अलंकार आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाण. येथील रामाचे मंदिर व परिसर हे आजही अनेकांना कायम खुणावत असते. हे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी.
पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते. या सांस्कृतिक राजधानीचे जे अलंकार आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाण. येथील रामाचे मंदिर व परिसर हे आजही अनेकांना कायम खुणावत असते. हे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी.
नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. त्यांचे मूळ आडनाव ' खिरे ' होते. यांचे वडील सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाचे जोशी-कुलकर्णी. श्री रामदास समर्थांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या पाडळी येथे नारो आप्पाजी यांचा जन्म झाला. नारो अप्पाजींचे मूळ नाव नारायण असे होते व मुंज होईपर्यंत त्यांचे वास्तव्य पाडळी येथेच होते. त्यामुळे रामोपासनेचा वसा त्यांना लहान वयातच मिळाला असावा. एक दिवस नारो आप्पाजी आई वर रुसून पुण्याला आले व तिथेच त्यांची गोविंदराव खासगीवाले यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी खासगीवाले यांनी लहानग्या नारायणास आश्रय दिला जिथे आता सद्य राम मंदिर आहे. त्या काळी या जागेत श्री खासगीवाले यांची तुळशीची बाग होती. तेथून लहानग्या नारायण श्री खासगीवाले यांना तुळशी तोडून आणून देत असे. पुढे हीच जागा त्याने विकत घेतली व तिथे राम मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे.
नारो आप्पाजी पुढे स्वकर्तृत्वावर मोठ्या नावारूपास आले. जमा, खर्च व महसूल या विषयांत त्यांनी मोठे काम केले. १७५० साली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारो आप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. निजामाने पुण्यावर जेव्हा हल्ला केला तेव्हा मोठ्या हुशारीने नारो आप्पाजी यांनी पुणे वाचवले आणि या हल्ल्यात अस्ताव्यस्त झालेल्या पुण्याला पूर्वपदावर आणायचे काम सुद्धा नारो आप्पाजी यांनीच केले. नारायण पेशव्यांची हत्या, सास्टीची लढाई आदी संकट काळात नारो आप्पाजी मोठी कामगिरी पार पाडली.
पेशव्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व घरगुती संबंध होते. पेशव्यांच्या खासगीतील महत्वाची कामे ही त्यांनी पार पाडलेली दिसून येतात.
इ.स. १७६१ मध्ये नारो आप्पाजी यांनी राम मंदिराची स्थापना केली. पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच नारो आप्पाजी यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यात ( शके १६८३ माघ ) राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. त्यासाठी आसपासची जागा ही विकत घेतली. इ.स. १७६३ नोव्हेंबर मधे ( शके १६८३ माघ ) देवळाचा उंबरा मुहूर्ताची बसवण्यात आला. २ वर्षांनी म्हणजेच १७६५ च्या नोव्हेंबर मधे ( शके १८८५ मार्गशीर्ष ) राम , लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती घडवण्यात आल्या.या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडवल्याबद्दल त्यांना ३७२ रुपये देण्यात आले ( तेव्हा सोने १५ रुपये तोळा होते ).
रामासमोरची प्रसिद्ध काळ्या पाषाणातील दास मारुतीची मूर्ती बखतराम पाथरवट गुजराथी यांनी घडवली. त्यास ४० रुपये खर्च आला. इ.स. १७६७ मधे मारुतीच्या मूर्तीस झिलई देऊन देऊळ बांधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यास ५२ रुपये खर्च झाल्याची नोंद हि इतिहासात मिळते. पुढे ४ वर्षांनी गणपती व पार्वती यांच्या मूती नारायण पाथरवट यांच्याकडून करवण्यात आल्या. रामासाठी मुकुट, कुंडलं, कंठी असे १११८ रुपयाचे दागिने नारो आप्पाजी यांनी करून घेतले. नारो अप्पाजींचा राम भक्तीचा वारसा त्यांच्या वंशजांकडेही आल्याने त्यांच्या वंशजानीही प्रेमाने रामासाठी दागिने करून घेतले.
राम मंदिर पूर्ण होण्यास बराच कालावधी लागला. एकूण खर्च १३६६६७ रुपये इतका झाला. त्यापैकी मंडपास ५१२० रुपये, ओवऱ्यास ६३४ ९ रुपये आणि वृंदावनास १५८ रुपये खर्च झाले. उत्तरेकडील भागात राहण्यास हा वाडा बांधण्यात आला. हे काम नारो आप्पाजी यांचे चिरंजीव रामचंद्र यांच्या काळात पूर्ण झाले. देवस्थानास इनामे ही प्राप्त झाली. खड्याच्या लढाईसंदर्भात केलेल्या नवासानुसार सवाई माधवराव पेशवे यांनी उत्तरेकडील दरवाज्यावर नगारखाना आहे तिथे चौघडा सुरु केला.
तुळशीबाग मंदिराचे आवार एकूण एक एकर आहे. उत्तर दक्षिण-पश्चिम अशा तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सध्या असलेला सभामंडप इ.स. १८८४ मधे नंदराम नाईक यांनी बांधला व पूर्वीच्या शिखरावर उत्तुंग असे वैशिष्ट्यपूर्ण शिखर बांधले ज्याची उंची ७५ फूट असून शिखरावर कोनाडे आहेत ज्यात देवता, साधू संत व पेशवेकालीन व्यक्तींच्या मूर्ती आहेत. शिखरावरील कळस ४ फूट आहे. असे शिखर पुण्यात दुसरीकडे कुठेच नाही. सभामंडप २० फूट उंचीचा असून त्यात ३ दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. मंडपाची लांबी ६० फूट व रुंदी ४० फूट आहे . मुख्य मंदिराभोवती गणपती, दत्त, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव, मारुती व शेषशाई ही मंदिरे आहेत. यातील शेषशाईची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेषशाईसमोर कोनाड्यात महादेव, गरुड, मुरलीधर यांच्या मूर्ती आहेत. येथील मुख्य उत्सव म्हणजेच रामनवमीचा उत्सव जो आजही प्रसिद्ध आहे. पेशवाई काळात अनेक मंदिरे उभारली गेली. कालौघात बऱ्याच मंदिराचे स्वरूप बदलले परंतु तुळशीभग राम मंदिर आजही जुन्या स्वरूपात भव्यता टिकवून आहे. रामोपासनेची पताका आजही येथे डौलाने फडकत आहे.
सन्दर्भ :
लेखन - श्री. मंदार लवाटे
प्रकाशक - श्री रामजी संस्थान, तुळशीबाग - पुणे
Instagram : @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment