सरदार मुजुमदार वाडा, कसबा पेठ - पुणे
मुजुमदार (मूळ शब्द - मजमू (फारसी)) म्हणजे महसूल गोळा करणारा. श्रीमंत पेशवे यांच्याकडून जी आज्ञापत्रे, राजपत्रे, देणग्या, सनदा, जहागिऱ्या दिल्या जात त्यांची नोंद मुजुमदारांच्या दप्तरात होऊन त्यावर त्यांच्या सहीचा शिक्का पडल्यावर तो कागद कायदेशीर ठरत असे. या घराण्याचे मूळ पुरुष नारो गंगाधर यांना इ. स. १७१४ मध्ये शाहू महाराजांकडून संपूर्ण राज्याचा मजमूचा अधिकार मिळाला. या नारो गंगाधर यांनी पुढे संन्यास घेतला. त्यांच्या निधनानंतर या वाडय़ाजवळच त्यांची समाधी बांधली आहे.
सरदार मुजुमदार यांच्या वाडा १९४८ सालची गोष्ट. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामधील कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाडय़ात पं. भीमसेन जोशी प्रथमच गाणार होते. त्यांची ओळख करून देताना आबासाहेब मुजुमदार म्हणाले, ‘याच गादीवर प्रख्यात गायक अब्दुल करीम खाँ यांचे गायन झाले आहे. रसिकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारे त्यांचे शिष्य सवाई गंधर्व यांचेही गायन इथे झाले आहे आणि आज गंधर्वाचे शिष्य भीमसेन जोशी हेदेखील इथे गाणार आहेत. म्हणजे एका अर्थाने संगीत क्षेत्रातील गुरुकुलाची परंपरा ही वास्तू जोपासत आहे..’ हे शब्द कानावर पडताच भीमसेन जोशी तात्काळ गादीवरून बाजूला झाले आणि त्या बैठकीला मन:पूर्वक वंदन करून म्हणाले, ‘माझं भाग्य थोर की अशा ऐतिहासिक गादीवर बसून मला माझी कला सादर करण्याची संधी मिळाली.’ कार्यक्रम अर्थातच विलक्षण रंगला. गायनाचार्य भास्करबुवा बखलेंपासून शोभा गुर्टूपर्यंत जवळजवळ पाच हजार गुणी गायक – गायिकांच्या सुरांचा हा वाडा साक्षीदार आहे. केवळ गाणं गाण्यासाठी नव्हे तर ते ऐकण्यासाठीही इथे बॅ. जयकर, न. चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, पु. ल. देशपांडे.. अशी जाणकार आणि प्रतिष्ठित मंडळी येत असत. म्हणूनच सुरांचा राजवाडा ही पु. लं.नी दिलेली उपाधी या वाडय़ाला शोभून दिसते.
नारो गंगाधर यांचे नातू नारो निळकंठ यांनी १७७० मध्ये हा वाडा बांधला. लाकूड, चपटय़ा विटा, माती, शिसं, गूळ आणि एक विशिष्ट प्रकारचे गवत यांनी बांधलेल्या या वाडय़ाला त्या काळी एक लाख रु. खर्च आल्याची नोंद आहे. तेव्हाच्या तीन मजली, सात चौकी वाडय़ाचा परीघ आता तीन चौकापर्यंत सीमित झाला आहे.
शनिवारवाडय़ाच्या खिडकी दरवाजाच्या पूर्वेला उभारेलला हा वाडा अठराव्या शतकातील वास्तुकलेचं जिवंत प्रतीक आहे. लाकडावरील अप्रतिम कोरीव काम, प्रमाणबद्ध कमानी, चौकाभोवती उघडणाऱ्या खिडक्या.. अशा वैशिष्टय़पूर्ण गोष्टींनी हा वाडा सजला आहे.
वाडय़ाच्या उत्तराभिमुख दरवाजासमोर उभं राहिलं की प्रथम नजरेत भरतात ती दुसऱ्या मजल्यावरील महिरपी नटलेली गवाक्षं, खालच्या भागात फूटभर नक्षीदार जाळी असलेली गवाक्षं आणि बाहेरील बुलंद दरवाजा आपल्याला पाहता पाहता पेशवाईच्या काळात घेऊन जातो. वाडय़ाची एक खासियत म्हणजे दिंडी दरवाजातून आत शिरलेली व्यक्ती कुठल्याही कानाकोपऱ्यातून दिसते.
पहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं. चौकाच्या दोन्ही बाजूला लांबलचक ओसऱ्या आहेत. एका ओसरीवर दिवाणजींची खोली, त्याला लागून माजघर. त्याला चिकटून मुदपाकखाना (स्वयंपाकघर), शेजारी न्हाणीघर शिवाय बाळंतिणीची खोली, पूर्ण प्रदक्षिणा घालता येईल एवढं मोठं देवघर ही पूर्वापारची रचना आजही तशीच आहे.
मधोमध असलेलं ठसठशीत वृंदावन हा मधल्या चौकाचा विशेष. तिथेच बाजूला एक गोडय़ा पाण्याची विहीर आहे. पेशव्यांच्या काळात सर्व सरदारांच्या विहिरी खापरी बोगद्याने कात्रजच्या धरणाला जोडल्या होत्या. त्यामुळे त्यातील पाणी कधीही कमी होत नसे. आज विहीर वापरात नसली तरी पाणी बख्खळ आहे. विहिरीच्या बाजूलाच मुदपाकखाना आहे. (सोवळ्याने पाणी आणण्यासाठी सोय असावी). या ठिकाणी पूर्वीची तांब्या पितळेची अवाढव्य भांडी ठेवलेली दिसली. ही महाकाय भांडी एवढी वजनदार आहेत की बाजूच्या कडय़ा उचलायलाही दोन हातांची मदत घ्यावी लागते. पाटही दोनजण सहज मांडी ठोकून बसतील एवढे लांबरुंद. तिसऱ्या चौकातील जागा मात्र पानशेतच्या पूरग्रस्तांना देण्यात आलीय.
दुसऱ्या मजल्यावर असंख्य मैफिलींचा साक्षीदार असलेला इंग्रजी टी अक्षराच्या आकाराचा सुप्रसिद्ध गणेश महाल आहे. इथले चौदा सागवानी खांबही गाणं पिऊन तृप्त झाल्यासारखे वाटले. समोरच गणपतीचं लाकडी मयूरासन आहे.
गणेश महालाच्या डाव्या बाजूच्या भागाला जाळीची माडी म्हणतात. कारण पूर्वी तिथे नक्षीदार जाळी होती आणि सरदार घराण्यातील स्त्रिया गाणं ऐकण्यासाठी त्यापलीकडे बसत. नंतर ही जाळी राजा केळकर संग्रहालयातील मस्तानी महालासाठी देण्यात आली, पण नमुन्यासाठी म्हणून या राजेशाही जाळ्या दोन दरवाजांना लावलेल्या दिसल्या. या जाळीइतकीच पुरातन आणखी एक वस्तू गणेश महालात आहे, ती म्हणजे उत्सवाच्या प्रसंगी महालाच्या या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत घातली जाणारी सावरीच्या कापसाची गादी.
याच मजल्यावर इतर दालनांबरोबर एक आडाची माडी आहे. आडावर (विहिरीवर) बांधलेली माडी म्हणून हे नाव. पूर्वी इथे मुजुमदारांचा जामदारखाना होता. इथल्या शिसवी कपाटात घराण्याची सर्व कागदपत्रे तसेच आण्णासाहेबांनी संग्रहित केलेली ग्रंथसंपदा (संगीतातील २५०० ग्रंथ, एक हजार हस्तलिखित ग्रंथ आणि ५०० संदर्भ ग्रंथ) व्यवस्थित ठेवली आहे.
तिसऱ्या मजल्यावर काही दालनं आणि एक महाल आहे. येथील सुरूचे नक्षीदार खांब आणि छतावरील कोरीव नक्षी बघून मन थक्क होतं. इथे एक पोटमाळाही आहे. त्यावर पसरलेल्या मातीमुळे वाडा ऋ तुमानानुसार थंड वा उबदार राहत असे. १० जिने आणि शंभराच्या वर दारे-खिडक्या असलेल्या या वाडय़ाच्या भिंतींची जाडी तब्बल पाच फूट आहे. त्यामुळे भिंतीतील फडताळ हे चक्क एका खोलीएवढं वाटतं. या मातीच्या घराचा पूर्वेकडील काही भाग खचलाय ते पाहून वाईट वाटतं. ही पानशेतच्या पुराची देणगी. या कलत्या भागाला खालून लोखंडी खांब लावून आधार दिलाय.
डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि अनेक आठवणींचा मुक साक्षीदार असणारा वाडा आज ही सुव्यवस्थित आहे.
नोट - सरदार मुजुमदार वाडा गणपतीच्या उत्सवामध्ये पहाण्यासाठी उपलब्ध असतो. बाकीच्या वेळी आपणांस तो पाहता येत नाही.
पत्ता - सरदार मुजुमदार वाडा, दुर्वांकुर सोसायटी, शोभापूर, कसबा पेठ, शनिवार वाड्या जवळ, शनिवार वाड्याची पूर्व बाजू, पुणे - ४११ ०११
माहिती आभार - रामकुमार शेडगे
Comments
Post a Comment