श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बुधवार - पुणे भाऊसाहेब उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे नाव. ते पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. त्यांचा वाडा बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिर व शनिवारवाडा या दोन वास्तूंमध्ये आहे. त्यांचा दवाखाना देखील याच वाड्यात होता. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून "रंगारी" हे उपनाव पडलं होतं. शालूंवरून तेथील बोळास "शालूकर बोळ" म्हणून नाव होते. क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा सक्रीय सहभाग होता. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊ रंगारींचे मार्गदर्शन अनेक क्रांतीकारकांना लाभले. कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता तिथे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात थाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर त्यांना पुण्यात असा उत्सव सुरू व्हावा असे वाटू लागले. त्यानंतर भाऊ रंगारी, खासगीवाले व घोटवडेकर यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. १८९२ मध्ये स्थापलेला हा ह...