कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई
१९ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.
सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली.
छायाचित्र ( फोटो ) स्त्रोत :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळाच्या ( सन् २०२१ च्या ) वार्षिक अहवालातून
Comments
Post a Comment