श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
बुधवार - पुणे
भाऊसाहेब उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे नाव. ते पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. त्यांचा वाडा बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिर व शनिवारवाडा या दोन वास्तूंमध्ये आहे. त्यांचा दवाखाना देखील याच वाड्यात होता. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून "रंगारी" हे उपनाव पडलं होतं. शालूंवरून तेथील बोळास "शालूकर बोळ" म्हणून नाव होते.
क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा सक्रीय सहभाग होता. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊ रंगारींचे मार्गदर्शन अनेक क्रांतीकारकांना लाभले. कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता तिथे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात थाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर त्यांना पुण्यात असा उत्सव सुरू व्हावा असे वाटू लागले. त्यानंतर भाऊ रंगारी, खासगीवाले व घोटवडेकर यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. १८९२ मध्ये स्थापलेला हा हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती आहे, असे सांगण्यात येते. १३० वर्षे पूर्ण केलेल्या या मंडळाची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्" ने घेतलेली आहे.
राक्षसावर प्रहार करणारी मंडळाची गणेशाची मूर्ती प्रतीकात्मक संदेश देणारी आहे. पारतंत्र्यातील समाजाला तत्कालीन राजसत्तेविरुद्ध लढा देणारी प्रेरणादायी मूर्ती बनविण्यात आली. मंडळाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून व इतर पर्यावरणपूरक गोष्टी वापरून ही मूर्ती तयार करण्यात आली. भाऊसाहेब रंगारी यांनी स्वतःच्या मंडळाबरोबर अनेक मंडळांच्या मूर्ती घडविल्या. इको फ्रेंडली अशीच तिची व्याख्या करावी लागेल.
गणपती चतुर्भुज म्हणजेच चार हातांचा आहे. गणपतीने राक्षसाचा एक हात सोंडेत पकडला आहे. ३ हातात शस्त्रास्त्रे आहेत. पैकी एका हातात गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हातात धरून ठेवला आहे. एक हाताने राक्षसाचे केस पकडले आहेत. एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशमूर्ती भासते. स्थापनेपासून आजतागायत मूर्ती बदलण्यात आली नाही. श्रींच्या सागवानी लाकडी रथही तेवढाच जुना असल्याचे समजते. गणपतीपुढे समाजधुरंधर पुढाऱ्यांची आणि क्रांतिकारक यांची व्याख्याने, मेळे होत असत. मंडळातर्फे समाजहितोपयोगी उपक्रम राबविले जातात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आपल्या गणपतीची व्यवस्था लावून श्री. काशिनाथ ठकूजी जाधव यांना विश्वस्त म्हणून नेमले. सार्वजनिक गणेशोत्सवात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
जिथे गणपती बसतो तिथेच "भाऊसाहेब रंगारी भवन" नावाचा वाडा आहे. तो १८६७ साली बांधला गेला आहे असे समजते. गणेशोत्सवाच्या काळात भाऊ रंगरींचा वाडा पाहण्यास मिळतो. वाड्यात एक प्रदर्शनीच मांडण्यात आली आहे. भाऊ रंगारीच्या गणेशोत्सवाची माहिती व जुनी छायाचित्रं तिथे पाहायला मिळतात. वाड्यातील जुन्या खोल्या, शस्त्रसाठासुद्धा बघण्यास मिळतो. ठासणीच्या बंदुका, पिस्तुले, गोळ्या अशी अनेक ब्रिटिशकालीन शस्त्रास्त्रे वाड्यामध्ये सापडली होती. क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका येथे होत असत. दरवाजा आतून बंद असला तरी बाहेरून गुप्तपणे तो उघडण्याची सोय येथे होती आणि आहे. तसेच एकाचवेळेस सर्व दरवाजे लॉक होत असत. तळघर व भुयार जेथे होते ती जागाही दिसते. वाड्यात ठिकठिकाणी शस्त्रं साठविण्याच्या जागा आहेत. गणेशोत्सवासंबंधी योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या फ्रेम्स बघायला मिळतात. या वाड्यात अनेक थोर व्यक्ती येऊन गेल्या आहेत.
सन्दर्भ :
पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Comments
Post a Comment