विश्रामबाग वाड्याचा इतिहास , पुणे
श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठीम्हणून वाडा बांधायला घेतला.
या वाड्याच्या बांधकामास सन १८०३ मध्ये सुरुवात झाली व तो सन १८०९ मध्ये संपूर्ण बांधून झाला. या वाड्याच्या बांधकामासाठी २,००,५४० रुपये इतका खर्च आला. शिवाय हौद व मोरी बांधण्यास १४००० रुपये लागले. वाड्याच्या नैऋत्य दिशेस पुष्करणीचा हौद बांधला त्यास ८५०० रुपये इतका खर्च आला.
हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाद्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते.त्यांनतर सन १८२१ मध्ये इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली. या संस्कृत कॉलेजबद्दल पुढे एखादा लेख लिहून सांगेन. सन १८७९ मध्ये कुणीतरी दुष्ट मनुष्याने या वाड्यास आग लावली. त्यात वाड्याचे समोरचे दोन चौक जळून गेले पुढे पुण्यातील नागरिकांनी वर्गणी गोळा करून व नगरपालिकेच्या सहाय्याने तो दुरुस्त करण्यात आला. पुढे तो नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला.
सध्या वाड्यातील बहुतांश भागात महानगरपालिकेचीच ऑफिसेस आहेत. एक सांस्कृतिक केंद्र आहे जिथे कलाकाराना आपली कला दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शासकीय ग्रंथालय आहे जिथे हजारो पुस्तके ग्रंथप्रेमींच्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. पूर्वी पेशवाईच्या अखेरच्या काळातले वैभव म्हणून गणला जाणारा हा वाडा आता मात्र रस्त्यावरील वाहतून कोंडीची शिकार बनला आहे.
- माहिती व छायाचित्र आभार : शंतनू परांजपे
- माहिती स्त्रोत : http://www.shantanuparanjape.com/2020/03/vishrambagwada.html?m=1
Comments
Post a Comment