जुना बाजार, पुणे
प्रत्येक शहरात एक जुना बाजार असतो. जो त्या शहराची ओळख, अविभाज्य घटक असतो. तसा पुण्याचाही आहे. मंगळवार पेठेत शिवाजी पुलाचा (नवा पूल) शनिवारवाड्याच्या बाजूला जिथे शेवट होतो, तिथून जवळच हा बाजार भरतो. काकासाहेब गाडगीळांच्या पुतळ्यापासून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना कुंभारवाड्याच्या समोर स्त्याच्या बाजूला दर रविवारी आणि बुधवारी हा बाजार न चुकता भरतो. त्यापूर्वी जुन्या बाजाराच्या जागा दोन-तीन वेळा बदलल्या. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि डॉ. अनिल अवचट यांच्या ‘पुण्याची अपूर्वाई’ या पुस्तकातील नोंदींनुसार पेशवाईनंतर हा बाजार शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरू लागला. नंतर नव्या पुलाखाली, आता महानगरपालिका आहे तिथे गेला. पूर्वी गुरांचा बाजारही तिथेच होता. जो नंतर गुलटेकडीला हलवला, मग हा बाजार शिवाजी आखाड्याच्या जागी गावठाणात हलला. शेवटी मंगळवार पेठेत आताच्या जागी स्थिरावला. पेशवाईपूर्वी तो कुठे होता, केव्हा सुरू झाला, किती मोठा होता, तिथे काय विकले जायचे आणि ते कोण विकत घ्यायचे याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, पेशवाईचा काळ धरला तरी दोनशे वीस वर्षांपासून पुण्यात जुना बाजार अस्तित्वात आहे, असे म्हणता येईल.
या जुन्या बाजाराने कितीतरी हौशी आणि दर्दी श्रीमंतांची घरे ‘अँटिक’ वस्तूंनी सजवली. विविध छंद जोपासणाऱ्यांना समाधानी केले. फिल्म बनवणाऱ्यांना हव्या त्या वस्तू मिळवून दिल्या. वारसा संशोधकांना बौद्धिक खाद्य पुरवले. अनेक संग्रहालयांना अनमोल दुर्मिळ वस्तूंची भेट दिली. पुण्यातील केळकर म्युझियममधील बऱ्याच वस्तू दिनकर केळकरांना इथेच मिळाल्या. अगणित गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात त्यांच्या गरजेच्या वस्तू पुरवून त्यांचे संसार चालवले आणि या बदल्यात या वस्तू विकणाऱ्यांचेही संसार उभे केले. कामगार, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील लोक हे इथले प्रमुख गिऱ्हाईक. जुन्या बाजारातील सर्व दुकानदारांची एक संघटना आहे. आठवड्यातील दोन दिवस सकाळी ८-८.३० पासून संध्याकाळी ५.३०-६ पर्यंत ही गजबज चालू असते.
सध्या दिसणारा जुना बाजार बराचसा नव्या वस्तूंनी भरला आहे. मध्येच काही पथाऱ्या (रस्त्यावरच मांडलेले/पसरलेले दुकान) अस्सल जुन्या वस्तूंच्या दिसतात. कुंभारवाड्याच्या बाजूला असणाऱ्या मासे, कोंबड्यांच्या दुकानांपासून त्या टोकाला असणाऱ्या बूट-चप्पलच्या दुकानांपर्यंत शेकडो छोटी-छोटी दुकाने दर बुधवारी आणि रविवारी इथे थाटली जातात. या दोन दिवशी निम्मा रस्ता इतर वाहनांसाठी बंद असतो.
गंजलेल्या वस्तू, साखळ्या, पाईप, कुलपे, किल्ल्या, वाहनांचे पार्ट, विळे, कोयते, अडकित्ते, तांब्या, भंगार, स्क्रू ड्रायव्हर, मोबाइल, सीडी, डीव्हीडी, गॉगल, हेडफोन, कात्र्या, भांडी, चाकू-सुरे, खेळणी, जुनी नाणी, दिवे, टेपरेकॉर्डर, रेडिओ, घड्याळे, इस्त्री, चित्रे, चप्पल, बूट, मासे, कोंबड्या, फर्निचर, कपडे, बाटल्या, टोप्या, छत्र्या, शेतीची अवजारे, खाद्यपदार्थ अशा सगळ्या वस्तू इथे एकत्र, शेजारी शेजारी नांदतात. सगळ्या दुकानदारांचा कल्ला, ओरडणे, मालाची जाहिरात करणे, गिऱ्हाईकाना बोलावणे अशी सरमिसळ असलेला हा रस्त्यावरचा बाजार म्हणजे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा बाजार आहे.
दर बुधवार आणि रविवारी सकाळी ८.३०-९ वाजता दुकानदार परस्पर ठरलेल्या ठिकाणी त्यांचे तात्पुरते स्टोअर एकत्र करतात आणि त्यांना सायंकाळी ५.३० वाजता ते वेगळे करतात. साधारणपणे मंगळवार पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ या भागातील विक्रेते इथे आपला व्यवसाय करतात. त्यातील काही पिढीजात आहेत. पावसाळ्याचे दोन-तीन महिने पावसाच्या जोरावर अवलंबून असतात, एरव्ही मात्र वर्षभर जुना बाजार चालू असतो.
पायऱ्या उतरून खाली मशिदीच्या बाजूला झोपडपट्टीला लागून स्वतंत्र कपड्यांचा बाजार भरतो. काशी कापडी, जोशी आणि वाघारी समाज पिढ्यानपिढ्या या व्यवसायात आहे. भाड्याने कॉट घेऊन त्यावर जुन्याला नवे बनवलेले कपडे, जीन्स, साड्या यांचे तात्पुरते दुकान थाटले जाते. इतर दिवशी घरोघरी फिरून लोकांचे जुने कपडे भांडी किंवा पैसे देऊन विकत घेतले जातात. त्यावर कौशल्याने काम करून नवे रुपडे देऊन या बाजारात नव्या घरात जाण्यासाठी हे कपडे सज्ज होतात. पेशवाईत नाना वाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात भरणारा हा जुन्या कपड्यांचा बाजार नंतर फुले मंडई, कॉंग्रेस भवन, गावठाणचा जुना गाव परिसर आणि शेवटी आताच्या जागेत आला.
जुन्या बाजारात आणखी काही वर्षांनी काय पाहायला आणि विकायला, विकत घ्यायला मिळेल सांगता येणार नाही. ‘जुन्या’ची व्याख्या कदाचित बदललेली असेल, पण आत्तापुरते बोलायचे झाल्यास पुण्याच्या जुन्या बाजाराने नकळतपणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात स्वतंत्र स्थान मिळवले आहे. पर्यटक, विशेषतः परदेशी पर्यटक या बाजाराची आवर्जून चौकशी करतात. आपणही हा जुना बाजार एकदा तरी अनुभवायला हवा.
माहिती आभार :
सुप्रिया शेलार ( Sahapedia )
Comments
Post a Comment