वसुबारस ( गोत्सव व गोधना )
दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.
Comments
Post a Comment