महादेव काशिनाथ गोखले
पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल.
नाव महादेव काशिनाथ गोखले, जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला.
महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या वर्षी सुरु झाला ते ९० वर्षापर्यंत सुरूच होता. सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळाला जाऊन यायचे तेही पायी.
शीर्षासन करून फक्त दोन्ही हातावर पर्वती चढायचे तर कधी पाठमोरं चढायचे. आपल्या बायकोला पाठंगुळीवर घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर ४३ वेळा वेळा केला होता. आता एवढा व्यायाम असेल तर खुराक पण तसाच हवा नां राव. नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एकावेळी ९० जिलेब्या पैजेवर सहज फस्त करायचे. त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी. ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदी पेढे पाठवून द्यायचे. पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाई दुकानातून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोहचवले जायचे.
या अचाट भिडूच्या स्कीलचा वापर कोणी केला नसता तर नवल. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. तेव्हा त्यांनी क्रॉसकंट्री मॅरेथोन स्पर्धेत २५७ मेडल मिळवले होते. त्यांची किर्ती ऐकून ४ ब्रिटीश अधिकारी त्यांच्याकडून ऑलिम्पिकसाठी ट्रेनिंग घ्यायचे. फावल्या वेळात त्यांना मराठी, हिंदी शिकवायचे. पुढे त्यांना साठेबिस्कीट कंपनीमध्ये नोकरी लागली. साठे बिस्कीटचे मुख्यालय होते कराचीला. तर बाबुरावांना पावसाळ्याचे ४ महिने सोडले तर कराचीला आठ महिने नोकरीसाठी राहावं लागायचं. पण तिथेही त्यांची अंगातली रग शांत बसायची नाही. कराची-पुणे हा प्रवास ते सायकलवरून करायचे. तिथूनच त्यांनी मानसरोवरला सायकलप्रवास देखील केला होता.
पुण्यात असताना त्यांना बालगंधर्वांच्या गाण्याची आवड निर्माण झाली होती. ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवायचे.(आता बास की किती काय करणार) मग बालगंधर्वांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचा डोअरकीपर म्हणूनही नोकरी केली होती. तिथे त्यांची सगळी गाणी पाठ झाली. पुढे कराचीला आल्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसची आई म्हणजेच जद्दनबाई, बेगम आरा या त्याकाळच्या सर्वोत्तम गायिका गोखल्यांकडून गंधर्व स्टाईलचं गाण शिकण्यासाठी येत. त्यांची किर्ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहचली. बाबुराव गोखलेंना त्यांनी बडोद्याला प्रिंटींग शिकवण्याच्या नोकरीवर ठेऊन घेतलं. पण खरा उद्देश त्यांच्या धावण्याला वाव देणे हा होता.
१९३६ साली जेव्हा बर्लिनमध्ये ऑलिम्पिक होणार होते तेव्हा बडोद्याच्या महाराजांना हिटलरचे खास निमंत्रण होते. सयाजीराव जर्मनीला आपल्या सोबत बाबुराव गोखल्यांना घेऊन गेले. स्पर्धेदरम्यान गोखल्यांची हिटलरशी ओळख करून दिली. अनवाणी रोज ६०-७० किलोमीटर धावणाऱ्या या अवलिया धावपटूवर हिटलर फुल इम्प्रेस झाला. त्याने गोखल्यांना जर्मनीत काही दिवस ठेवून घेतले. त्यांचा पाहुणचार केला होता. हिटलरशी त्याकाळात त्यांची चांगली मैत्री झाली होती. पुढे ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जुने शिष्य व तेव्हाचे गव्हर्नर स्वतः आले. हे बघून बडोद्याचे महाराजसुद्धा आश्चर्यचकित झाले होते.
असा हा अवलिया माणूस. तारुण्यात गंमत म्हणून घरात चित्ता, अजगर असे प्राणी पाळायचा. टिळकांचे नातू म्हणजेच माजी विधानसभा अध्यक्ष जयंतराव टिळक हे त्यांचे खास मित्र. त्यांच्यासोबत अनेकदा शिकारीसाठी रानोमाळ भटकन्ती केली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वतःचं पेपरविक्री आणि बुक बाईंडिंगच छोटसं दुकान उघडलं आणि आयुष्यभर ते संभाळल. जवळपास १०३ वर्ष जगले. रोज जेवणाला १५ भाकऱ्या खाल्ल्या. आणि हे त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून जाणवायचं देखील नाही. आयुष्यात एकदाही दवाखान्याचे तोंडही बघितल नाही. त्यांच्या मृत्यू नंतर मेडिकल सर्टिफिकेट कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या लेकीला आणि जावयला पडला होता.
ही कथा वाचली तरी आपल्याला वाटेल भिडू आपल्याला थापा मारतोय. मात्र आजही पेठेत गेले तर अनेक जण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमाचे साक्षीदार सापडतील. २००१ साली त्यांना प्रसिद्ध योगगुरु बिसी अय्यंगार, जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी, संस्कृत पंडीत लक्ष्मणशास्त्री शेंडे यांच्यासोबत पुण्याचा मानाचा शारदा ज्ञानपीठ सन्मान देण्यात आला.
सुप्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्तमानपत्रात श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता त्यात या सगळ्याचा उल्लेख केला आहे.
Comments
Post a Comment