अदालतवाडा ( अदालत राजवाडा ) छत्रपती संभाजीमहाराजांनंतर राजाराममहाराजांना जिंजीस जावे लागले व महाराणी येसूबाई यांना आपले नऊ वर्षांचे पुत्र शाहूराजे यांच्यासह औरंगजेबाची कैद पत्करावी लागली. पुढे सन १६९९ मध्ये ( जून ) राजाराममहाराज साताऱ्यास आले व त्यांनी आपली नवी राजधानी सातारा झाल्याचे जाहीर केले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून सुटले ( सन १७०८ ) व साताऱ्यास येऊन सातारा येथे आपला राज्याभिषेक केला. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे लहानसे खेडे होते. राजधानीचे ठिकाण झाल्यावर शाहूराजांनी त्याचा विकास केला. त्याच वेळी त्याचे नामकरण शाहूनगर असे करून तेथे काही वाडे बांधले. त्यांपैकी अदालतवाडा व इतर काही वास्तूंचे अवशेष आज साताऱ्यात पाहावयास मिळतात. सातारा किल्ल्याच्या माचीला अदालतवाडा ही वास्तू आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. छत्रपती शाहूमहाराजांनी आपले प्रशासन जेव्हा साताऱ्यात सुरू केले, तेव्हा न्यायनिवाडे करण्यासाठी व इतर शासकीय कामांसाठी हा वाडा बांधण्यात आला. १० फूट उंचीच्या जोत्यांवर उभा असलेला ६७ मीटर लांब व ४८ मीटर रुंद असा हा वाडा जवळजवळ ३०० वर्षे अभेद्य ...