Skip to main content

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ - पुणे / Shrimant Dagluseth Halwai Ganpati, Budhwar Peth - Pune

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ - पुणे

गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरांतील काही गणपतींची नावे विशेषत्त्वाने समोर येतात. त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे. बाहेरगावहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, " आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. "

महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. सध्या ही मूर्ती कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.


नंतर सन १८९६ साली बनवलेली मूर्ती थोडी जीर्ण होऊ लागली होती. त्यामुळे सन १९६७ साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्तीं बनवण्या करीता संकल्पना झाली व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शंकरअप्पा शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. ही मुर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे सूर्य ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली, गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.


पुढे १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले.

शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहेत. बैठय़ा मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुगूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्टय़. या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.


उत्सव काळात पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे एक खास वैशिष्टय़ ठरले.

सन्दर्भ :
१ - लोकसत्ता संकेतस्थळ
२ - इ - सकाळ संकेतस्थळ
३ - पुलिस मामा संकेतस्थळ
४ - विकिपीडिया संकेतस्थळ
५ - दगडूशेठ वार्षिक अहवाल

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...