निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व, अनेक मूर्त्या, कोरीव लेण्या आणि मंदिर - या सर्व गोष्टींनीं परिपूर्ण असलेला सह्याद्री पर्वत रांगातील एक दुर्गम डोंगर म्हणजे " हरिश्चंद्रगड "
- पौराणिक महत्व
हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुना हरिश्चंद्रेश्वर शिवमंदिर आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
' शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु ।
लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥ '
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
- ऐतिहासिक महत्व
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यापासून हा किल्ला वेगळा आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. हा किल्ला मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे के प्रतिक आहे. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी १८१८ मध्ये हा किल्ला जिंकला.
- मंदिराच्या मुख्य दारावर असलेल्या मूर्तियां पैकी एक शिल्प " किर्तीमुख "
मंदिराच्या प्रवेश द्वाराच्या उंबऱ्यावर , देवतांच्या प्रभावळीवर, मंदिराच्या स्तंभावर , मंदिराच्या कळसावर , देवतांच्या अलंकारावर असे मोठे डोळे असलेले , शुळा सारखे दात असलेले , अक्राळ विक्राळ मुख असते त्याला कीर्ती मुख म्हणतात. कलाकाराच्या कल्पने प्रमाणे किर्तीमुखाचे रूप बदलत असते. किर्तीमुखाच्या दोन कथा प्रचलीत आहेत , व त्या थोड्या फार फरकाने सांगितल्या जातात. या दोन्ही कथा मध्ये दैत्याचे नाव व त्याचा हेतू बदलतो परंतु दोन्ही कथांमध्ये दैत्याच्या कृतीचा परिणाम एकाच आहे .
पहिली कथा अशी की , एक दैत्य (बहुदा जलंदर) तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न करतो , व खाण्या साठी मागतो , महादेव त्याला स्वतःला खायला सांगतात , त्याप्रमाणे तो स्वतःला खातो व शेवटी जेव्हा त्याचे मुख राहते तेव्हा शिवाच्या आज्ञे प्रमाणे थांबतो. प्रसन्न झालेले शिव त्याला मंदिराच्या उंबरठ्यावर स्थान देतात व मंदिरात येणाऱ्याचे पाप खाण्याचे सांगतात.
दुसरी कथा अशी की, एकदा एक दैत्या (काही ठिकाणी योगी , यक्ष आहे) कडुन प्रमाद होतो व त्याला मारण्यासाठी भगवान शिव एक विशाल दैत्याला उत्पन्न करतात .परंतु उत्पन्न झालेल्या दैत्याला पाहून तो अपराधी शिवाला शरण येतो व शिव त्याला क्षमा करतात. परंतू उत्पन्न झालेला दैत्य शिवाला विचारतो "आता मी काय खाउ ? , ज्याला मी खाणे अपेक्षित होते त्याला तुम्ही अभय दिले ". त्यावर शिव त्याला स्वतःचे शरीर खायला सांगतात. आज्ञेनुसार दैत्य स्वतःचे शरीर खायला सुरू करतो. आज्ञेचे पालन करतांना पाहून महादेव प्रसन्न होतात व त्याला थांबायला सांगतात परंतु तो पर्यंत त्याचे मुखच तेवढे राहते.
या दोन्ही कथा मध्ये मुख्य फरक असा की , पहिल्या कथे मध्ये दैत्य भूक शमावण्या साठी शिवाची उपासना करतो , तर दुसऱ्या कथेत अपर्याध्याला शासन करण्यासाठी दैत्याची उत्पत्ती शिवा कडून होते. कथा कोणतीही असली तरी त्याचे मंदिरातील स्थान अनन्य साधारण आहे. सदर कीर्तीमुख हे हरिश्चंद्रगडावरच्या महादेव मंदिरातील आहे.
- धर्मशास्त्रानुसार पुण्यपद असलेला तलाव " पुष्करणी तलाव "
भारतात नद्यांप्रमाणेच तलावांनाही धार्मिक महत्त प्राप्त झालेले आहे. बहुसंख्य देवालयांसमोर तलाव बांधलेले आढळून येतात. असाच एक पुष्करणी तलाव हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या.
सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक वा कृत्रिम रीत्या झालेल्या जलसंचयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादींच्या बांधकामाने वास्तुदृष्ट्या जे आकर्षक स्वरूप दिले जाते, त्यास तलाव म्हणतात. तलाव हे आकारमानाने सामान्यतः सरोवरापेक्षा लहान व विहिरीपेक्षा मोठे असतात. तलावाला, ताल, तालाब, तडाग, पुष्करणी, वापी, वापिका अशी भिन्नभिन्न नावे आहेत. यांपैकी काही नावे वैशिष्ट्यनिदर्शक आहेत. उदा : पुष्करणी म्हणजे कमळांचे तळे. यात पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या होत्या. जुन्या काळी अशा तलाव बांधण्याची पद्धत होती.
तलावाचा उपयोग गावास पाणीपुरवठा, देवळास शोभा, धार्मिक कार्ये, अग्निशमन, सृष्टिशोभा, पांथस्थाची सोय अशा अनेक कारणांनी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तलावाचे बांधकाम दगडी करून तलावातील पाण्याचे शोषण कमी करता येते. ज्या भागांत मोठ्या नद्या कमी; तिथे देवळाच्या प्राकारात तलाव बांधीत असत. या तलावांकाठी घाट, दीपमाळा, ओवऱ्या, स्तंभावल्या, महाद्वारे इ. बांधण्याची प्रथा होती.
सार्वजनिक उपयोगासाठी तलाव बांधणे, हे धर्मशास्त्रानुसार पुण्यपद मानले गेले आहे. असे तलाव बांधून ते सार्वजनिक कार्यासाठी अर्पण करण्याचा ‘तडागोत्सर्ग’ हा एक प्राचीन धार्मिक विधी होता. मत्स्यपुराण, नारदपुराण आदी पुराणांमध्ये या विधीविषयी वर्णन आढळते. या विधीचाच एक भाग म्हणून सोन्याचे मासे, कासव वगैरे करून ते तलावात सोडावेत, असे म्हटले आहे. अशा स्वरूपाचे विवेचन महानिर्वाणतंत्र (अठरावे शतक) या ग्रंथात आढळते. भुवनदेवकृत अपराजितपृच्छा (बारावे–तेरावे शतक) या ग्रंथात तलावांचे सहा प्रकार मानले आहेत; ते असे : (१) अर्धचंद्राकृती ‘सर’, (२) गोलाकार ‘महासर’, (३) चौकोनी ‘भद्रक’, (४) भद्रक एकमेकांना जोडून बनलेले ते ‘सुभद्र’, (५) ज्या तलावांत बगळे उतरतात ते ‘परिघ’ व (६) दोन परिघ एकमेकांना जोडलेले ते ‘युग्मपरिघ’.
- हरिश्चंद्रगडावरील लेणी
पुणे - नगर व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दी जेथे एकमेकींशी भिडतात त्या जागीच हरिश्चंद्रगड आहे. तेथील कोकणकडा, प्राचीन मानवाची वस्ती असणाऱ्या खुणा दाखविणारे अवशेष, श्री हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, उद्ध्वस्त शिल्पे, स्मृतिशिला यांच्याबरोबरच तेथील लेणीही महत्त्वाची ठरतात. मंदिरापासून थोड्या अंतरावर तारामती शिखराच्या पोटात आणखी एक लेणीसमूह आहे. त्यामध्ये पुरुषभर उंचीची देखणी गणेशमूर्ती ठळकपणे लक्षात राहते. त्यावरूनच या छोट्या लेणीसमूहाला गणेशलेणी म्हणतात.
पुणे - नगर व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दी जेथे एकमेकींशी भिडतात त्या जागीच हरिश्चंद्रगड आहे. तेथील कोकणकडा, प्राचीन मानवाची वस्ती असणाऱ्या खुणा दाखविणारे अवशेष, श्री हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, उद्ध्वस्त शिल्पे, स्मृतिशिला यांच्याबरोबरच तेथील लेणीही महत्त्वाची ठरतात. मंदिरापासून थोड्या अंतरावर तारामती शिखराच्या पोटात आणखी एक लेणीसमूह आहे. त्यामध्ये पुरुषभर उंचीची देखणी गणेशमूर्ती ठळकपणे लक्षात राहते. त्यावरूनच या छोट्या लेणीसमूहाला गणेशलेणी म्हणतात.
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या चक्रपाणी पुस्तकातील ७ वे प्रकरण सिद्धपीठात हरिश्चंद्रगड महत्त्वाचे आहे. डब्ल्यू. एफ. सिक्लेअर यांचा ' दि इंडियन अँटिक्वेरी' च्या ५ व्या खंडातील हरिश्चंद्रगडाच्या संदर्भातील लेख महत्त्वाचा आहे. त्याशिवाय जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्जेस यांच्या ' दि केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया ' या ग्रंथात आणि इतरत्रही हरिश्चंद्रगडावरील ९व्या शतकातील मंदिर व तेथील शिल्पे व शिलालेखांची नोंद घेतलेली आहे.
श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या लगतच्या गुहा, श्री केदारेश्वर लेणे आणि तारामती शिखराच्या पोटात श्री गणेशाची प्रतिमा असणारे लेणे असे तीन लेण्यांचे गट गडावर आहेत. या सर्वच लेण्यांची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हरिश्चंद्रगडावरील श्रीकेदारेश्वर लेणे बऱ्या अवस्थेत आहे. परंतु लेण्याच्या ओट्यावर असणाऱ्या भव्य खोदीव शिवलिंगाजवळ असणाऱ्या खांबांची तोडफोड झाली आहे. या लेण्यात छातीभर पाणी कायमचे साठलेले असते.
- गणेश लेणी ( गणेश गुंफा )
सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर बाप्पाचं अस्तित्व आहेच. दुर्गम गडकोटांसह लेणी तसंच गडद-गुहांमध्येही बाप्पा विसावलेला आहे.
हरिश्चंद्रगडावर सुद्धा बाप्पाची अनेक प्राचीन रूपं पाहायला मिळतात. तारामती शिखराच्या पोटाशी माथ्यापासून अदमासे दोनशे फुटावर खाली अनेक लेण्या आहेत. त्यापैकी गणेश लेणीत बाप्पाचं भव्य रूप डोळ्यांत साठवावं अशी ती मूर्ती. मूर्तीची उंची साधारणतः दोन मीटर आहे. अनेक पौराणिक कथांशी हरिश्चंद्रगडाचा इतिहास जोडलेला असल्यानं बाप्पाचं हे शिल्प हजारो वर्षांचा इतिहास जपून आहे. या बाप्पाच्या आकारावरून त्याचं लंबोदर हे नाव सार्थ ठरतं. शेंदूरचर्चित शिल्पाच्या मागील दोन्ही हातांमध्ये शस्त्र आहेत. पुढील उजवा हात आणि पाय थोडा भग्न असून डाव्या हाती प्रसाद आहे. डाव्या पायावर स्वस्तिक कोरलेलं आहे. मुख्य म्हणजे, बापाच्या या मूर्तीला लिंग सुद्धा आहे. हरिश्चंद्रगडाच्या भ्रमंतीत बाप्पांचं हे देखणं रूप चित्तावर ठसा उमटवून जातं. एवढंच नव्हे तर खुद्द हरिश्चंद्रेश्वराचं जे देऊळ आहे त्या देवळाच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरसुद्धा एक गणेशमूर्ती पाहायला मिळते. या देवाला सभोवताली आठ शिलालेख कोरलेले आहेत.
- युग किंवा काळाचा प्रतीक असलेला " केदारेश्वर गुहा ( केदारेश्वर मंदिर ) "
केदारेश्वर मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे. हे मंदिर एका गुहेत वसलेले आहे. इथे वर्षभर पाण्याची उपस्थिती असते. गुहेच्या मध्यभागी सुमारे पाच फुट उंचीचे शिवलिंग आहे. शिवलिंग पर्यंत जाण्यासाठी कंबर खोल आणि बर्फा सारख्या थंड पाण्यातून जावं लागतं. लिंगाभोवती चार खांब आहे, पण सध्या त्यातून एकच खांब अखंड आहे.
काहींचा असा विश्वास आहे की हे चारी खांब युग किंवा काळाचे प्रतीक आहेत, म्हणजेच सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग. सध्याचा अखंड स्तंभ शेवटच्या आणि अंतिम युगाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते, जेकी सध्याचे कलीयुग आहे. अशाप्रकारे एक विश्वास अस्तित्वात आहे की जेव्हा हा शेवटचा आणि उरलेला स्तंभ तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल. गुहेच्या भिंती शिल्प आणि कोरीव कामाने परिपूर्ण आहेत. म्हणून ह्या मंदिराला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक अद्वितीय मंदिर म्हणायला पण काही हरकत नाही.
रुद्र आणि विराट स्वरुप असलेला एक कडा म्हणजे " कोकणकडा "
किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
- " सोनकी " फुलांचे पुष्पोत्सव
हरिश्चंद्रगड इथं श्रावणानंतर पुष्पोत्सव भरतो असं म्हटलं, तर ते वावगं ठरणार नाही. सह्याद्रीतल्या सोनकीसह विविध प्रकारच्या फुलांचे गालिचे या गडावर अनुभवता येतात. हरिश्चंद्रगड या ट्रेकमध्येही भरपूर फुलं पाहायला मिळतात. या फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरं आणि मधमाशा पाहताना निसर्गाच्या किमयेचं कौतुक वाटतं.
आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व, अनेक मूर्त्या, लेण्या, मंदिर पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.
माहिती, सन्दर्भ आणि स्त्रोत :
१. मूर्ति अभ्यासक आणि शिल्प प्रेमी - अभिजीत इंगळे
२. लेणी महाराष्ट्राची ( प्र. के. घाणेकर )
३. तलाव माहिती - विकासपीडीया
४. अन्तर्जाल - विकिपीडिया
अतिशय सुरेख आणि मुद्देसूद लेख. धन्यवाद या विस्तृत आणि सुरेख माहितीसाठी 🙏
ReplyDeleteखूप छान दादा
ReplyDelete