पर्वती लेणे, पर्वती टेकडी ( पुणे )
पर्वती टेकडीच्या दक्षिण उतारावर शाहू महाविद्यालयाजवळ आणि गृहनिर्माण मंडळाच्या नव्या वसाहतीच्या मागे एक अतिशय सामान्य खोदीव गुहा आहे. गुहेमध्ये खूप पाणी साचले आहे. गुहेसमोरील खोदीव प्राकारावरून येथे आणखी खोदकाम करण्याची मूळ योजना असावी असे वाटते. याच्या कालखंडाबाबत निश्चितपणे कोणतेही विधान करता येत नाही. वटवाघळांची मोठी वसाहतच या लेण्याचा आश्रय घेऊन राहते आहे. दोन बुटके खांब, त्यांवर तोलून धरलेले छत, त्यांना मदतनीस म्हणून आणखी ४-५ ओबडधोबड खांब अशा या खोदीव गुहेची लांबी ११ मीटर व रुंदी ६ मीटर तसेच उंची ७.५ मीटर भरते.
जानेवारी १९७६ मध्ये शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या लेण्यातील गाळ काढणे, साचलेले पाणी उपसून टाकणे अशी स्वच्छता मोहीम पार पाडली होती. त्या गाळात व दगडधोंड्यांच्या मलब्यात कोणतेही प्राचीन अवशेष मिळाले नव्हते. पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १, पान ७३ वर या लेण्याचा उल्लेख आहे - " गुंफा- ( पर्वतीच्या ) दक्षिणेच्या बाजूस टेकडीच्या पोटात पूर्वाभिमुख एक गुंफा आहे. तिथे आता तुडुंब पाणी आहे. श्री. विष्णू रघुनाथ करंदीकर यांनी ती उपसून पाहिली होती. गुंफा दुघई दिसते. पुढे एक टाके आहे . "
सन्दर्भ :
- लेणी महाराष्ट्राची ( प्र. के. घाणेकर )
- पुण्याची पर्वती ( प्र. के. घाणेकर )
Comments
Post a Comment