तुळजा लेणी, जुन्नर ( पुणे )
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले.
तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि एकही शिलालेख आढळलेला नाही.
लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे.
लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून हे या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. या लेण्याच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग गोलाकार असून त्यावर ‘अंड’ आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ आहेत. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत.
लेणे क्र. ४ लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे आणि बाजूच्या खोलीत तुळजाभवानीची स्थापना केली आहे.
लेणे क्र. ५ ते १२ यांचा दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत कड्याच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे कोरलेल्या दिसतात.
लेणे क्र. १३ हे या गटातील शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतींत खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असावा.
सुरेश जाधव यांनी तुळजा लेणे क्र. तीनचा काळ इ. स. पू. सुमारे ६५-५३ ठरविला आहे. तसेच स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील प्रारंभीच्या लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या पहिल्या टप्प्यातील उदाहरणे असून ती इ. स. पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली गेली असावीत.
संदर्भ : मराठी विश्वकोश
Comments
Post a Comment