( मनाचा दूसरा गणपती )
बुधवार पेठ - पुणे
बुधवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी देवीमंदिर आहे. सध्या भर वस्तीत असलेला काही शतकांपूर्वी पुणे अगदीच छोटे गाव असताना हा भाग गावाबाहेर लांब होता. तेव्हा या भागातून आंबील ओढा वहात असे. त्याकाळी ओढ्याकाठी देवीची मूर्ती होती. देवीचे मंदिर पेशवेकालीन असावे. काही वर्षांपूर्वी शेंदराचे कवच निखळल्यावर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन झाले. देवीची मूळ मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे. योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. महिषासूराच्या बारा सेनापतींपैकी देवीने ताम्रासुराचा वध केला म्हणून ताम्रवर्णी योगेश्वरी म्हणजेच 'तांबडी जोगेश्वरी' नाव पडले असे म्हटले जाते. देवी शेंदुरलिप्त असते म्हणूनही तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते. श्रीमंत पेशवे येथे देवी दर्शनास येत असत.
अशा या ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या गणेश मंडळास पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचे दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव मंडळाने साजरे केले आहे. सुरुवातीला देवीच्या मंदिरातील विष्णू मंदिरासमोरील जागेत उत्सव साजरा होत असे. पुढे २००० सालापासून देवीच्या मंदिरालगत मंडप बांधून गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. साधेपणाने उत्सवाचे पावित्र्य राखत उत्सव साजरा केला जातो.
मंडळाच्या गणेशमूर्तीत एक वेगळेपण आहे. तिचे तेज उत्सवाच्या काळात दिवसेंदिवस वाढत जाते आणि आपण नकळत बाप्पांपुढे नतमस्तक होतो. गंजिफा नावाचा प्राचीन पत्त्यांचा खेळ आपणास माहित असेल. तर या गणेशमूर्तीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गंजिफांवरील हत्तीचा चेहरा ह्या मूर्तीला लाभलाय. मंडळाच्या गणेशमूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते आणि पुन्हा नव्याने मूर्तीची स्थापना करण्यात येते. मूर्तिकार गुळुंजकर घराणं प्रतिवर्षी श्रींची मूर्ती तयार करीत होते. १८९३ ते २०१४ पर्यंत त्यांच्या चार पिढ्यांनी ही सेवा केली. २०१५ पासून मूर्तिकार विठ्ठल गिरे हे गणपती मूर्ती बनवत आहेत. डाव्या सोंडेची गणेशमूर्ती चार हातांची असून मागील दोन हातात शस्त्रे आणि पुढील डाव्या हातात मोदक व उजवा हात अभयमुद्रेत आहे.
श्रींची सर्वांगसुंदर मूर्ती चांदीच्या देव्हाऱ्यात विराजमान होते. २०१३ साली उत्सवाच्या १२१ व्या वर्षी देव्हारा तयार करण्यात आला. चांदीच्या पालखीतून बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. पालखी कार्यकर्ते स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतात. चांदीची पालखी १९९२ साली म्हणजे शताब्दीच्या वर्षी केली गेली. तत्पूर्वी सरदार नातू यांच्या घराण्याची पालखी वापरात होती. देव्हारा व पालखीचे कलाकुसरीचे काम श्री. पुखराज मिस्त्री यांनी केलेले आहे. मंडळाच्या शताब्दी निमित्त गणेश महाल उभारण्यात आला होता.
गणपतीपुढे 'मेळे' सादर होत असत. या मेळ्यांची भूमिका स्वातंत्र्यपूर्व कालखंडात महत्त्वाची होती. सन्मित्रसमाज मेळा, छत्रपती मेळा, राक्षे मावळी मेळा, भारत मेळा इत्यादी मेळ्यांचे कार्यक्रम होत होते. तसेच बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे अशा प्रसिद्ध गायकांचे कार्यक्रम झाले आहेत. नकलाकार भोंडे यांनीसुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कधीकाळी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण होते 'फ्लोट्स'. फ्लोट्स म्हणजे जिवंत देखावे. ऐतिहासिक, सामाजिक विषयांवर देखावे सादर केले गेले. त्याचबरोबर मर्दानी खेळ, मल्लखांब असे खेळ सादर झाले.
दररोज पहाटे अथर्वशीर्षपठण, गणेशयाग, सत्यनारायणपूजा, मंत्रजागर असे अनेक धार्मिक कार्यक्रम परंपरेने साजरे केले जातात. मंडळात महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. मंडळात एक दिवस 'महिला दिन' साजरा होतो. शिस्तबध्द मिरवणुक हे मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे. नगारावादन, बँड व ढोल ताशा पथके मिरवणुकीची रंगत वाढवतात. मंडळाने गणेशमूर्ती हौदात विसर्जित करायचे पाऊल २०१५ सालापासून टाकले.
तांबडी जोगेश्वरी देवी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची व्यवस्था वेगवेगळी आहे. मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आयोजित करते. १९९३ साली झालेल्या किल्लारी भूकंपग्रस्त महिलांना मदत, कारगिल युद्धानंतर जवानांच्या कुटुंबासाठी निधी, देवदासींची वैद्यकीय तपासणी व एड्सग्रस्त महिलांना वैद्यकीय मदत, पुणे विद्यार्थी गृहातील विद्यार्थी दत्तक योजनेसाठी निधी अशी अनेक सामाजिक कामे केली आहेत.
सन्दर्भ :
पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Instagram : ©TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment