श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री संत लिंबराज महाराज ( फुरसुंगीकर ) यांची समाधी, श्री क्षेत्र फुरसुंगी - पुणे
१६ व्या शतकात फुरसुंगी येथील हरपळे घराण्यात श्री संत लिंबराज महाराज या थोर युगपुरूषाचा जन्म झाला. संपूर्ण आयुष्य विठ्ठल नामास अर्पण केल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या या जन्म गावीच चैत्र शुद्ध तृतीयेस संजीवन समाधिष्ठीत होवून आपल्या कार्याची सांगता केली. अशा या थोर महात्म्याच्या हातून या विठ्ठल-रुख्मीणी मंदिराची स्थापना झाली. श्री संत तुकाराम महाराज यांच्याशी अनेकदा किर्तन प्रवचनाच्या निमित्ताने त्यांचे संबंध आले. तेव्हापासून ते आताच्या या चालु पिढीपर्यंत या घराण्यात वारकरी संप्रदाय परंपरेने चालत आला. या घराण्यात चालत आलेल्या अनेक थोर पुरूषांनी ग्रंथ निर्मितीचे कार्यही केले. संशोधन खात्यात त्यातील काही "भक्तप्रताप" सारखे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. तर काही काळाच्या ओघात नाहीसेही झाले आहेत.
सन १७७२ साली या घराण्यातील चौथ्या पिढीतील वंशजाचा नानासाहेब पेशवे यांचेकडुन मोत्याचा कंठा व मोहरा देवून सत्कार करण्यात आला. याच घराण्यातील सातव्या पिढीत वै.ह.भ.प.विठ्ठल महाराज फुरसुंगीकर ही थोर विभुती होवून गेली. ज्यांनी घर-प्रपंच या कशाचाही विचार न करता अखंड विठ्ठल धर्मच आंगिकारला. किर्तन प्रवचनातून समाज प्रबोधन केले. श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे धर्मशाळा बांधली व आयुष्यभर सामाजिक बांधीलकी जपत मोठा शिष्य संप्रदाय गोळा केला. संपूर्ण भारतभर सतत किर्तनाच्या निमित्ताने भ्रमण केले. पायी चारी धाम तिर्थ यात्रा केली. अन्नदानाचे पवित्र कार्य आयुष्यभर केले.
हिंदू धर्मप्रसाराचे साध्य मनोमन धरून कराची (पाकिस्तान) पर्यंत जावून किर्तने केली व मोठा शिष्य संप्रदाय जमा केला. श्री संत गाडगे महाराज, श्री संत तुकडोजी महाराज, क्रांतीवीर नाना पाटील यांच्या सानिध्यात राहून समाज प्रबोधनाचे थोर कार्य केले, आणि आपले गाव व घराणे यांची किर्ती दिगंत केली. सन २८ ऑक्टोबर १९८४ ला आळंदी येथे वयाच्या ९८ व्या वर्षी माऊलींचे चरणी देह ठेवला. त्यांचे पश्चात त्यांच्या कार्याची धुरा या घराण्याचे आठवे वंशज त्यांचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर विठ्ठल हरपळे यांनी आळंदी येथील धर्मशाळेचा व सन २००१ मध्ये या विठ्ठल रूख्मीणी मंदिराचा जिर्णोद्धार करून समर्थपणे सांभाळली.
श्री संत लिंबराज महाराज संस्थान
श्री क्षेत्र फुरसुंगी, पुणे
Instagram : ©TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment