श्री तुळशीबाग गणपती
( मनाचा चौथा गणपती )
बुधवार पेठ - पुणे
पुण्यात बुधवार पेठेत तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. अनेक वर्षांपासून तुळशीबाग ही महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली बाजारपेठ. फक्त पुणेकरांमध्येच नव्हे, तर पुण्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तुळशीबागेची क्रेझ असते. येथील तुळशीबाग मंडळाचा गणपती म्हणजे पुण्यातील हा मानाचा चौथा गणपती. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि गर्दीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती हे मंडळाचे आकर्षण आहे. १९०१ मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. तुळशीबागेचा गणपती चार हातांचा असून डाव्या सोंडेचा आहे. वरील दोन हातात पाश, अंकुश असून खालील डाव्या हातात मोदक तर उजवा हात अभयमुद्रेत आहे. मंडळ गणेशोत्सवात आकर्षक सजावट करते. या भव्य गणपतीच्या पिछाडीस एक छोटा पेशवेकालीन गणपती पहायला मिळतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे असे कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केले जात. अनेक मान्यवर लोकांची भाषणे, लोकनाट्येदेखील होत असत. थोर शास्त्रीय गायकांचे गायनदेखील येथे झाले आहे. तुळशीबाग गणेशोत्सवाची भव्य देखाव्यांची परंपरा होती. १९५२ पासून त्याला सुरुवात झाली आणि ती परंपरा २००० पर्यंत चालू होती. विशेष म्हणजे मंडळाचा पहिलाच देखावा हलता होता. अजंठा वेरूळ लेणी, संत तुकाराम वैकुंठगमन, भीम-धृतराष्ट्र, अहिरावण-महिरावण, अमृतमंथन असे अनेक देखावे मंडळाने सादर केले आहेत. अनेक प्रयोग करून सजावटी करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांत देखाव्यांची जागा स्थिर देखावे, म्युरल्स या प्रकारांनी घेतली आहे.
मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त १९७५ मध्ये कलामहर्षी दत्तात्रय श्रीधर म्हणजेच डी. एस. खटावकर यांनी देशात प्रथमच फायबर ग्लासमधून वजनाला हलकी, पारदर्शक आणि टिकाऊ मूर्ती तयार केली. त्याआधी प्रतिवर्षी नवी मूर्ती बनवून विसर्जित केली जात असे. मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीय शिल्पकलेचे सौंदर्य नागरिकांना बघता आले. डी. एस. खटावकर यांनी अनेक वर्षे या गणपतीची सजावट केली होती. ते मंडळाचे अध्यक्ष देखील होते. पुण्यातील याच मंडळासाठी नव्हे तर इतर मंडळांसाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले होते. कलामहर्षी 'डी. एस. खटावकर मार्ग' असे येथील रस्त्यास त्यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी खटावकरांना मातीचे पोते आणण्यासाठी १ रुपया दिला होता, तेव्हापासून खटावकर त्यांना गुरुस्थानी मानत. त्यांचे चिरंजीव विवेक खटावकर आता हा कलेचा वारसा पुढे नेत आहेत..
सध्या आपण जी मूर्ती पाहतो ती १९८८ साली शिल्पकार विवेक खटावकर यांनी बनविली आहे. तात्यासाहेब गोडसेंनी मातीचा गोळा ठेऊन त्यांच्या या कामाचा श्रीगणेशा केला होता. कर्नाटकातील हळेबिडू येथील हेमाडपंथी गणपती मूर्तीवरून मंडळाची गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे असे समजते. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाडूची छोटी मूर्ती बनविली जाते. त्या मूर्तीस उत्सव काळात पूजेची मूर्ती म्हणून मान असतो. उत्सवमूर्तीची प्रतिकृती ही छोटी मूर्ती असते. डी. एस. खटावकर यांच्या काळापासून ही ६५ वर्षांची परंपरा आहे. तुळशीबाग गणपती पूर्वी खटावकरांचा गणपती म्हणून ओळखला जायचा, असे विवेक खटावकर सांगतात. त्यांच्याकडे १९३२ चा गणेशोत्सवासंबंधीचा एक ब्रिटिशकालीन परवाना संग्रहीत आहे.
जशी इतर गणपतीस सोन्याचांदीची आभूषणे दिसतात तशी याही गणपतीस चांदीची आभूषणे आहेत. त्यात परशू आणि अंकुश अशी दोन चांदीची आयुधे आहेत. अंदाजे १५० किलो चांदीचे दागिने गणपतीस आहे. 'श्रीं'च्या मूर्तीस बर्मा या लाकडापासून पाटही तयार करण्यात आला असून त्यावर देखील चांदी लावली आहे. मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग मंडळाची मंगलमूर्तीची भव्यता कायमच भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो.
सर्वसाधारणपणे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये भव्य मूर्ती साकारण्याची परंपरा नाही. परंतु ही मूर्ती त्याला अपवाद म्हणावी लागेल. सध्या मात्र बऱ्याच मोठ्या मूर्ती बनविल्या जातात. विसर्जन मिरवणूक मार्गावर म्हणजेच लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाल्यावर तुळशीबाग मंडळाची भव्य मूर्ती लक्षवेधी ठरते. आणखी एक वैशिष्ट्य कार्यकर्ता आणि कलाकार यांची तिसरी पिढी मंडळात कार्यरत आहे. मंडळ फक्त गणपती उत्सव साजरा न करता अनेक सामाजिक कामे देखील करते.
सन्दर्भ :
पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Comments
Post a Comment