Skip to main content

गड व त्यांचे प्रकार.

प्रकार – गडाचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग, असे प्रकार पडतात.

1) भुदुर्ग – नावाप्रमाणेच ,सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा : चाकण ,परांडा ,नळदुर्ग इ.

2) गिरीदुर्ग – उंच डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, तोरणा, राजगड इ.

3) जलदुर्ग – पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला
म्हणजे जलदुर्ग होय. उदा : सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा इ.

4) वनदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा.

5) जोडकिल्ले – एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या शिखरावर,जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदाः पुरंदर -वज्रगड, चंदन-वंदन. यासंदर्भात आज्ञापत्रात उल्लेख सापडतो.
“एका गडासमीप दुसरा पर्वत,किल्ला असू नये, असल्यास तो सुरूंग लावून गडाचे आहारी आणावा, जर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.“

6) गडाची तटबंदी – कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलखतच …. ,प्रामुख्याने गडाची तटबंदी
ही त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते परंतु जास्त करून तटबंदी एकसलग गडमाथ्यावर आपल्याला दिसते परंतु इथे शिवनिर्मित गडाचे एक वैशिष्ट्य सांगावे वाटते शिव -निर्मित गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अर्ध्या टप्प्यांवर दिसते. तटबंदी प्रामुख्याने विटा, माती, दगड इ. वस्तूंचा वापर करून उभारली जात असे.

गडावरील टाक्या खोदताना निघणारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे. तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट. तोफांचा, नैसर्गिक गोष्टींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई. तटाची उंची, जाडी, रूंदी ही प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना मजबुतीकरता प्रामुख्याने चुन्याचा वापर होई. तटबंदीचा वापर जास्त करून डोंगराच्या कमकुवत बाजूकडे प्रामुख्याने होतो, जिथे नैसर्गिक दुर्गमता आहे तिथे तटबंदीची गरज भासत नसे. उदाहरणार्थ रायगडची तटबंदी ..

फार वर्षांपूर्वी तटबंदी ही लाकडी फळ्या किंवा मातीची असत. जसजशी प्रगती होत गेली तसतसा पुढे यासाठी दगड व विटांचा वापर सुरु झाला. काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीतीनुसार आपल्याला त्याठिकाणच्या तटातील वेगळेपणही दिसून येते, जसे की तटासाठी वापरलेल्या दगडातील फरक, तटाची उंची, बांधणी, रचना इ. गरजेनुसार काही तटांची तात्पुरती तर काही ठिकाणी कायमची मजबूत बांधणीही केलेली दिसून येते.

7)- बुरुज – बुरुज म्हणजे मारा-गिरीकरण्याची एक मुख्य जागा टेहळणीसाठी संरक्षणाच्या दृष्टीने गडाची महत्त्वाची बाजू.तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमंतात टेहळणीसाठी बुरुज अतिशय महत्त्वाची जागा. तटबंदीमध्येच बाहेरच्या अंगाला याची वेगवेगळ्या आकारात मजबूत बांधनी केलेली असत. बुरूजाच्या बांधनीतही अनेक वेगवेगळे प्रकार कल्पकतेने राबवल्याचे दिसून येतात,यामध्ये गोलाकार, कोनांचा, पाकळ्यांच्या, दुमजली, चिलखती असे विविध प्रकारही आढळून येतात.बुरूज हे गडाचे प्रामुख्याने महत्त्वाचे अंग.बुरूज पडल्यावर अनेक किल्ले शत्रूच्या ताब्यात सहजतेने गेल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात आढळून येतात.

काही गडावर बुरूजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख निश्चितीसाठी त्यांना नावे दिलेली आढळतात जसे कि देवावरून, बुरूज ांच्या रचनेवरून, गावावरून उदा: हत्ती बुरुज, फत्ते बुरुज, झुंझार बुरुज, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ.अशी नावे आज रोहीडा, पुरंदर, तोरणा आदी किल्ल्यावरील बुरूजांची उपलब्ध आहेत.

8) चिलखती बुरुज – हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक ठिकाणी असे बुरूज असतात.गडाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे याच्या नावातच समजते. संरक्षणाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे चिलखतच, आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजगडची संजिवनी माची, अद्भूत, अविश्वासनीय, अकल्पनिय असे हे बांधकाम. नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संरक्षण म्हणजे चिलखती बुरूज… रायगडावरही असा चिलखती बुरुज आपल्याला पहायला मिळतो. शत्रूच्या हल्ल्यात चिलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूर्ण शाबूत रहावा अशी ही योजना. अतिशय संरक्षणात्मक आणि अप्रतिम अशी ही बांधणी.

9) फांजी – तटबंदीवर भिंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हणतात. पहारेक-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी ठिक-ठिकाणी तटबंदीवर सोपान बनवलेले
असतात.गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैनिकांना तटबंदी वर पहारा देण्यासाठी, फिरण्यासाठी याचा वापर होत असे. वेगवेगळ्या गडावर याच्या बांधणी,लांबी,रूंदयाच्या बांधणी,लांबी,रूंदी आदी गोष्टीतही विविधता आढळून येते.

10) जंग्या/झरोके – किल्ल्याच्या तटाला आतील बाजूकडून बंदुकीचा, बाणांचा मारा शत्रूवर करण्यासाठी छिद्र, भोके असतात त्यांना जंग्या असे म्हणतात, याची दिशा प्रामुख्याने खालच्या बाजूस तिरपी असते, किल्ल्याच्या आतून शत्रूला बंदूक, बाणाने सहज टिपता येईल अशी याची रचना असते. तटाच्या आतूनच शत्रूला न दिसता शत्रूवर मारा करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक ठिकाणी ही रचना आपल्याला आढळून येते. तटबंदी आणि बुरूजांतील विविध प्रकार आजही आपण अनेक किल्ल्यांच्या, वाड्यांच्या तटा-बुरूजावर पाहू शकतो.

11) चर्या – तटबंदीवर ,द्वारावर ,बुरूजांवर पाकळ्यासारखे,त्रिकोणी, पंचकोणी आकाराचे दगड बसवलेले असतात त्यांना चर्या असे म्हणतात. याच्या आड लपून शत्रूवर माराही करता येतो तसेच या मुळे किल्ल्याच्या सौंदर्यातही भर पडते. अशी वेगवेगळ्या आकारातील रचना किल्ल्यावर आढळून येते. उदा: राजगड – राजमार्ग

12) माची – माची म्हणजे गडाची पहिली सपाटीची जागा, बालेकिल्ल्या खालील लांब पसरलेले पठार, मुख्य गडापासून कमी उंचीची ही बाजू, आणि म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. माचीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हटले तर संजिवनी, सुवेळा, झुंजार अशी काही ठळक उदाहरणे घेता येतील. माचीच्या भौगोलिक रचनेवरून त्याचा वापर केला जात होता.जसे की राजगडची पद्मावती माची. या माचीच्या प्रचंड विस्तारामुळे, सपाटीमुळे माचीवरच वाडे, सदर, कोठारे, तलाव व इतर इमारतींची बांधकामे पहायला मिळतात. राजगड हा किल्ला माचीच्या दृष्टीने परिपूर्ण असाच आहे या गडाला असणा-या तीनही माच्या दुर्ग-बांधनीतील अद्भूत नमुनाच आहेत..

संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असणारी संजीवनी माची, सुवेळा माची संजीवनीचे दुहेरी तिहेरी तटबंदीचे बांधकाम, बुरुज, चिलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हणजे एक स्वतंत्र किल्लाच असे हे दुर्गबांधनीतील अद्भूत अचंबित करणारे
बांधकाम आपल्याला पहायला भेटते. प्रत्येक गडाला माची असतेच असे नाही.

13) बालेकिल्ला – बालेकिल्ला म्हणजे सोप्या भाषेत म्हटले तर किल्ल्यावर किल्ला, किल्ल्याची सर्वोच्च जागा. सर्वोत्कृष्ट उदाहरण राजगड चा अभेद्य बालेकिल्ला. इतर गडांपेक्षा सर्वात उंच असा राजगडचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर प्रामुख्याने महत्वाच्या सदर, वाडे, राजवाडा इ अशा इमारती असत. बालेकिल्ल्यावरून आक्रमणाच्या वेळी थोड्या शिबंदीसह ही शत्रूला तोंड देता येई. प्रत्येक किल्ल्याला उंच बालेकिल्ला असेलच असे नाही.

14) महादरवाजा – गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधनी, संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची, म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधनीतील एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो, तो म्हणजे महादरवाजाची गोमुखी बांधनी. उदा-रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी. दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी. भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पाय-या ही काही खास वैशिष्ट्ये. शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये लपवलेली अशी ही गोमुखी बांधनी. दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेक-यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते.गडाला महादरवाजा खेरीज एक, दोन असे वेगवेगळे दरवाजे असत.गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा.

15) दिंडीदरवाजा – मुख्य लाकडी दरवाजालाच असलेला एक लहान दरवाजा. जाण्या ऐण्यास, वापरण्यासाठी. रोजच्या वापरासाठी.

16) अडसर – गडाचा लाकडी दरवाजा बंद केल्यानंतर, आतील बाजूने आडवे लाकूड लावून बाहेरून दरवाजा उघडता येऊ नये यासाठी केलेली सोय. याच्या खोबण्या आज किल्ल्यावरील दरवाजाच्या आत आपण पाहू शकतो.

17) खिळे – गडाच्या लाकडी व्दारावर बाहेरील बाजूने अणकुचीदार विविध आकाराचे खिळे बसविले जात. शत्रूने, हत्तीने द्वाराला धडका दिल्यावर याद्वारे दरवाजांचे संरक्षण होई.
18) नाळ – तटबंदीच्या दोन तटांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून, बोळीसारख्या जागेची केलेली रचना म्हणजे नाळ होय. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी व शत्रूला गांगरुन सोडण्यासाठी ही रचना विशेष उपयुक्त अशी. यासंदर्भात शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या राजगडच्या संजीवनी माचीची नाळयुक्त तटबंदीची रचना विशेष पाहाण्यासारखी आहे. दोन तटबंदीमध्ये विशिष्ट अंतर सोडून याची वैशिष्ट्यपूर्णअशी रचना आहे.

19) देवडी – मुख्य दरवाजामध्येच दरवा-ज्याच्या बाजूला असलेली, दरवाजावर तैनात असलेल्या सैनीकांच्या,पहारेक-यां-च्या बसण्याची, विश्रांतीची, पहारा देण्याची जागा, चौकी. तसेच सैन्याला रात्रीच्या विश्रांतीसाठी केलेली सोय.

20) चौकी – गडावर येणा-या वाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने पहा-याच्या चौक्या असत. येणा-या लोकांवर नजर ठेवणे, पाहणी करणे इ कामे चौकीवर नेमलेले चौकीदार, सैनिक करत.

21) गस्त – गडावर सैनिकांनी रात्री दिवसा दिलेला सशस्त्र पहारा म्हणजे गस्त होय. ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट. विशिष्ट हत्यारबंद सैनिंकासह ठराविक वेळी पहारा, गस्त दिली जाई. वेगवेगळ्या वेळी ठराविक वेळी यासाठी पहारेकरी नेमले जात.

22) नगारखाना – नगारखाना म्हणजे गडावरील विशिष्ट, कार्यक्रमाच्या, सुचनेच्या प्नसंगी, सुचना देण्यासाठी, इशा-याच्या वेळी नगारा, शिंग, तुतारी व इतर वाद्य वाजवण्याची सर्वोच्च जागा.

23) सोपान मार्ग – तटबंदीवर, गडावर ठिकठिकाणी,ये जा करण्यासाठी असलेला दादर, जिना, पायरी मार्ग म्हणजे सोपान मार्ग. गडावर उंच ठिकाणी किंवा दरवाजा, बुरुज, तटबंदीवर ये जा करण्यासाठी याचा वापर होई.

24) दरबार – राज्याच्या वाटचाली संदर्भात, विशेष सण ,समारंभ, कार्यक्रम गडावरील महत्वाच्या निर्णय प्रसंगी एकत्र सभा, चर्चा करण्याची जागा. राजधानी रायगडावर असा दरबार आपणास पहावयास भेटतो. या दरबारातील सर्वोच्च क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा होय.

25) मेट – गडावर चढून जाताना वाटेत घरे असलेली, वस्ती असलेली जागा म्हणजे मेट. गडावर जाणा-या वाटा, लोक यांवर लक्ष ठेवणे हे या मेटकरांचे काम. या मेटांना विशिष्ट अशी नावे असत, जसे रायगडावर आंब्याचे मेट, सावंतांचे मेट इ. मेटांची नावे आढळतात. यावरून यांची स्थाननिश्चिती होत असे. गडाच्या सुरक्षेच्या, संरक्षणाच्या दृष्टीने ही मेटे अतिशय उपयोगी.

26) पहारा – गडाच्या मुख्य जागा सोडून अवघड, अनघट खळग्याच्या जागा असत अशा ठिकाणी खबरदारी म्हणून पहारे नेमले जात. अशा खळग्यांना विशिष्ट नावे व पहारेकरी असत. पहारेकरी संख्या त्या त्या भागानुसार असत. रात्रीची गस्त घालणे हे यांचे मुख्य काम. उदा: रायगड – महाद्वाराचा खळगा, निवडुंगीचा खळगा, हिरकणीचा खळगा
इ.

27) घेरा – एका विशिष्ट गडाचा घेरा म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी,आसपास असलेली सर्व गावे, सर्व मुलुख, बाजूला परिसर म्हणजे त्या गडाचा घेरा होय.

28) गुहा – अनेक गडावर आपल्याला गुहा आढळून येतात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित… संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा याचा वापर गडासाठी होत असे. काही ठिकाणी काही विशिष्ट साधनसामुग्री साठविण्यासाठी ही याचा वापर होई.

29) भुयारे – गडावरून आपत्कालीन वेळी शिताफीने, गुप्तरितीने निसटण्यासाठी बाहेर पडण्यासाठी जमिनितून खोदून, बांधकाम करून केलेले मार्ग. आज गडावर सहसा अशी जागा आढळून येत नाहीत. तर काही ठिकाणी नैसर्गिक स्थितिमुळे बुजलेल्या अवस्थेत आढळतात.

30) नेढे– नेढे म्हणजे गडाला, कड्याला एखाद्या ठिकाणी नैसर्गिकपणे आरपार पडलेले विशिष्ट आकाराचे छिंद्र, भगदाड. उदा : राजगड, रतनगड इ.

31) चोरदिंडी – “….किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिता गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या, त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या….” शिवछ्त्रपतींच्या आज्ञापत्रातानुसार किल्ल्यास मुख्य दरवाजा खेरीस दुसरे दरवाजे, चोरदिंड्या असाव्यात. यानुसार आपल्याला किल्ल्यावर असे दरवाजे तटबंदीमध्ये, गडाच्या अपरिचित बाजूला, दुर्गम ठिकाणी याची बांधनी आढळून येते.एखाद्या संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी निसटून जाण्यास याचा उपयोग होई.

32) चुन्याचा घाणा – गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे. असे घाणे आज आपल्या-ला रोहिडा, तिकोणा, विसापूर, विजयदुर्ग अशा गडांवर पहायला भेटतात.

33) तोफा – किल्ल्यातील संरक्षणासाठी लढाऊ दृष्टीने अविभाज्य घटक. तोफा या साधारण ओतिव, घडीव आणि बांगडी प्रकाराच्या पहायला मिळतात. ओतिव म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तसेच घडीव म्हणजे नावाप्रमाणे घडवलेली. गडा-वर गडाच्या आवाक्यानुसार तोफा असत याच्या आकार व्यासावर मा-याचा टप्पा ठरतो. तोफा या प्रामुख्याने मिश्र धातूच्या बनवल्या जात जसे की लोखंडी, पंचधातू, पितळी इ. प्रत्येक तोफेची मारा करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

34) शिबंदीची घरटी – गडावर आवश्यकतेनुसार शिबंदीची व्यवस्था असत .यामध्ये सर्व अधिकारी, सेनापती, व इतर सैन्य् सर्वांच्या राहण्याची व्यव-स्था केलेली असत. रायगडावर सर्व शिबंदी ही जगदीश्वराच्या पुढील भागात असे. आज आपण त्या घरांचे चौधरे तेथे पाहू शकतो.प्रत्येक गडावर त्याच्या आवाक्यानुसार शिबंदी/सैन्य संखेनुसार ठेवले जाई.

35) टाके/तलाव – गड बांधताना सुरवातीला पाणी पाहूनच काम चालू होई..तलाव खोद-ताना निघालेला सर्व दगड तटबंदी व इतर बांधकामासाठी वापरला जाई प्र-त्येक गडावर आपल्याला अनेक टाकी तलाव विशिष्ट नावाने पहायला मिळतात.कोणत्याही किल्ल्यावर पाणी ही महत्त्वाची गरज आहेच, तो कायमस्वरूपी असावा तसेच गडावर सर्व शिबंदीला लागेल एवढे पाणी हवेच त्यासाठी काही ठिकाणी खोदून तर काही ठिकाणी बांधीव तलाव टाकी, विहिरी गडावर निर्मिले जात. गडाच्या महत्वाच्या गरजांच्या दृष्टीने पाणी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

36) बंधारा – गडावरील पाणलोटाच्या ठिकाणी बांध घालून पावसाळ्यातील पाण्याचा साठा केला जाई. गडावर अतिरिक्त पाणी साठा यामुळे उपलब्ध होई. गडावरील विविध कामांसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी या पाण्याचा वापर केला जाई.

37) सदर – सदर ही गडाची अतिशय महत्त्वाची जागा , यावरूनच कामकाजाचे, न्यायाचे अतिशय महत्वाचे निर्णय, बैठका, न्यायनिवाडे केले जात. मह्त्वाचे कार्यक्रम सदरेवर भरवले जात. सदर ही गडानुसार बालेकिल्ल्यावर, माचीवर अशा वेगवेगळ्या प्रकारे आढळून येते. यामध्ये राजसदर, किल्लेदाराची सदर, तटसरनौबताची सदर इ. प्रकारही आढळून येतात.

38) राजवाडा – गडावर राजाच्या, राजकुटुंबाच्या राहण्याची केलेली विशेष सोय. शिवरायांच्या राजवाड्यांचे अवशेष आज आपण रायगड, राजगड अशा गडावर पाहू शकतो. आपल्या सर्वांसाठी पवित्र, वंदनीय अशी जागा.

39) ध्वजस्तंभ – किल्ल्यावर राज्य करणा-या, नांदणा-या, राजवट करणा-या साम्राज्याचे, स्वराज्याचे निशाण लावण्याची जागा. प्रामुख्याने उंच ठिकाणी बुरूजावर असे.

40) धान्यकोठारे – गडावरील धान्य साठविण्याची जागा. गडावरील कुवतीनुसार धान्य साठवण्यास विविध कोठारे
असत. गडावरील लोकांच्या उपजिविकेसाठी धान्य साठा अतिशय महत्त्वाची गोष्ट. उंदीर, किडा-मुंगी, वाळवी, पाऊस
यांचा उपद्रव होणार नाही अशा पद्धतीने कोठारे बांधली जात. उन ,वारा पाऊस इ गोष्टींपासुन वाचण्यासाठी भक्कम
अशी रचना केली जाई.

41) दारूकोठारे – हा गडावरील अतिशय महत्त्वाचा साठा, गड लढविण्यास तोफांसाठी दारूसाठा ही अतिशय महत्वाची गोष्ट. दारूकोठारे प्रामुख्याने मुख्य वस्तीपासून दूर असत.याची विशिष्ट प्रकारची भक्कम अशी बांधणी केली जाई. किल्ला फार काळ झुंजत ठेवण्यासाठी, पाणी आणि धान्यसाठ्याबरोबरच, दारूसाठाही विशेष काळजीने जपला
जाई. वरील तीन गोष्टी गडावर जेवढ्या मुबलक प्रमाणात तेवढाच जास्त काळ गडावरून शत्रूशी तोंड देता येई. याबाबत ही आज्ञापत्रात उल्लेख आढळतात जसे की…..

“दारूखाना घराजवळ घराचे वारियाखालें नसावा.सदरेपासून सुमारांत जागा पाहून भोंवतें निर्गुडी आदिकरून झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा.तळघर करावें तळघरात गच्च करावा. त्यांत माच घालून त्या घरीं दारूचे बस्ते, मडकी ठेवावी.बाण होके आदिकरून मध्यघरात ठेवावे.सरदी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसी हवालदारानें येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मुद्रा करून ठेवीत जावें.दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्याणी रात्रंदिवस पाहरियाप्रमाणें जागत जावें.परवानगीविरहित आसपास मनुष्य येऊं न द्यावे….”

42) खलबतखाना – गुप्त वाटा-घाटी चर्चा करण्याची संरक्षीत जागा. महत्वाच्या मोहीमेचा, नियोजनांचा आढावा घेण्यासाठी, खासगी चर्चेसाठी असलेली जागा. गुप्त हेरांकडून, जासूसांकडून आलेल्या माहीतीची गुप्त रितीने चर्चा करण्याची संरक्षित खाजगी जागा.

43) शस्त्रागार – गडावरील सर्व शस्त्रसामग्री ,लढाईसाठी लागणारे सर्व शस्त्रे साठा ज्यामध्ये, ढाल तलवारी, बंदूका, चिलखत, भाले, पट्टे, इ सर्व महत्त्वाची, गरजेची शस्त्र शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा.

44) वस्त्रागार – गडावर आवश्यक असणारी, विविध  कारणांसाठी लागणारी, सर्व प्रकारची शाही वस्त्रे ठेवण्याची जागा शेले, कमरपट्टे, गादी, तक्के, लोड, पडदे सर्व कापड, वस्त्र इ .

45) मंदिरे – दैनंदिन पुजेसाठी आवश्यक असणारी , विविध देवदेवतांची, नानाविध प्रकारची सुरेख बांधणीतील मंदीरे प्रत्येक गडावर आपल्याला नक्कीच आढळतात, वेगवेगळ्या देवदेवतांची मंदीरे गडावर असत. याखेरीज गडावर विशिष्ट ठिकाणी कोरलेली देवदेवतांची शिल्पे, शिलालेख, अशा भरपूर गोष्टी अजूनही गडांवर आढळतात.

46) जवाहिरखाना/कोषागार – जड-जवाहिर, हिरे, मानके, दागिने अशी मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा. स्वराज्यातील सर्व मौल्यवान ऐवजी, कर रूपाने, लुटीच्या रूपाने मिळालेला सर्व ऐवज, सुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी केलेली सोय.

47) दफ्तरखाना – सर्व प्रकारचे चालणारे कामकाज, परस्परांमधील पत्रव्यवहार, खाजगी दस्ताऐवज, गडावरील सर्व ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रे, नोंदी, दस्ताऐवज, ठेवण्याची सुरक्षित जागा.

48) टांकसाळ – वेगवेगळ्या साम्राज्याची, स्वतःची दैनंदिन व्यवहारातील नाणी, शिक्के इ चलने तयार करण्याचा कारखाना. शिवकालीन शिवराई, होन अशी स्वराज्याची मौल्यवान नाणी पाडण्याचा कारखाना, टांकसाळ रायगडावर
होती.

49) शौचकुप – साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर निर्मिलेला वैज्ञानिक प्रयोग. प्रत्येकाने अभ्यासावा असा प्रयोग. अनेक शिवकालीन गडावर शौचकूपांची रचना केलेली आढळते, वाड्यांमध्ये, घरांमध्ये, पहारेक-यांसाठी तटबंदी मध्ये असे शौचकुप आढळून येतात. पहारेक-यासांठी खास तटबंदी मध्येच अशी रचना केलेली पहायला भेटते. उदा: रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड इ.

50) अंधारकोठड्या – गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना, फितूरांना, आरोपींना, शिक्षा म्हणून कैंद्यांना कैदेत ठेवण्याच्या, डांबून ठेवण्याच्या संरक्षीत कोठड्या.

51) पागा – गडावर येणारे घोडे, प्राणी यांच्या राहण्यासाठी, त्यांना बांधण्यासाठी केलेली निवा-याची सोय.

52) उष्ट्रखाना – उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा, उंट या प्राण्यांची बांधण्यासाठी केलेली सोय.

53) पिलखाना /हत्तीशाळा – गडावर असलेल्या, सैन्य दलात असलेल्या हत्तींना राहण्याची, निवा-याची केलेली सोय, जागा.

54) तालीमखाना – तालीमखाना म्हणजे मल्लशाळा .पैलवान मल्लांचा आखाडा तालीम.

55) अंबरखाना – गडावर धान्य साठविण्यासाठी बांधलेली इमारत.

56) कडेलोट कडा – कैद्यांना, फितुरांना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा. शिक्षा सुनाविल्यानंतर कैद्यांचा अशा ठिकाणाहून कडेलोट केला जाई. उदा: रायगडचा टकमक कडा , शिवनेरी कडेलोट कडा.

57) शिल्पे – प्रत्येक किल्ल्यावर प्रवेशद्वारावर, तटावर, मंदिरावर आपल्याला विविध प्रकारची शिल्पे आढळून येतात. जसे कि हत्ती, शरभ, सिंह, गंडभेरूड असे प्राणी तसेच दरवाजावर ,तटावर देव-देवता गणेश, मारूती इ. देवतांची पाना फुलांची विविध शिल्पे आढळतात. वेगवेगळ्या उद्देशाने, वेगवेगळ्या साम्राज्याची ओळख, ताकद दर्शविण्यासाठी कोरलेले विशिष्ट आकाराचे, चित्रांचे दगड.

58) शिलालेख– अनेक गडावर वेगवेगळ्या भाषेचे शिलालेख कोरलेले असतात. शिलालेख हे प्रामुख्याने उठावाचे किंवा खोदिव अक्षराचे असतात, शिलालेखातून किल्ल्यांचा, बांधकामाचा विविध राजवटींचा ऐतिहासिक उल्लेख, दस्तावेज आपल्याला मिळतो. किल्ल्यांची बांधणी, पुनर्बांधणी, डागडुजी काही ऐतिहासिक व्यक्तींचे उल्लेख, गडाबद्दलचा इतिहास, तेथील राजवटीची ओळख अशा महत्वपूर्ण गोष्टींची माहीती शिलालेखांच्या माध्यमातून कळते.

59) जोते/चौथरा – गडावरील वास्तूंचा, घरांचा पाया. घडीव मजबूत दगडांनी बांधून यावर वरील बांधकाम केले जाई.

60) समाधी –  गडावर, गडाच्या पायथ्याशी, गावांमध्ये, शुरविरांच्या ,राजघराण्यातील व्यक्तींच्या स्मरणार्थ उभारलेली
छत्री.

61) सतीशिळा – सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ केलेले शिल्प. पतिच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ एका दगडी शिळेवर विशिष्ट आकाराचे शिल्प कोरले जात ज्याला सतीशिळा असे म्हणतात. साधारण सतीशिळा गडावर तसेच अनेक गावांमध्ये, परिसरात आढळून येतात. यामध्ये त्या प्रसंगाचे प्रतिकात्मक चित्र
कोरले जाई.

62) वीरगळ – वीरगळ म्हणजे वीरपुरूषांच्या स्मरणार्थ उभारलेला स्तंभ, युद्धात, संग्रामात, युद्धभुमीत वीरमरण आलेल्या, धारातिर्थी पडलेल्या सैनिकाच्या, वीराच्या स्मरणार्थ दगडी शिळेवर विशिष्ट शिल्पांच्या आधारे कोरलेला दगड वीरगळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये वीराच्या पराक्रमावरून, लढाईच्या वर्णनावरून वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळी माहिती सांगणारे वीरगळ कोरले जात. असे बरेचसे दुर्लक्षित विरगळ आज अस्ताव्यस्त अवस्थेत किल्ले, गावे इ ब-याच ठिकाणी दुर्लक्षित स्थितीत पडून आहेत.

63) खंदक – शत्रूला किल्ल्याभोवती भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती विशिष्ट खोलीचा, वेगवेगळ्या दृष्टीने, खोदलेला संरक्षीत चर म्हणजे खंदक होय. खंदक हा प्रामुख्याने भुईकोट किल्ल्याभोवती खोदला जातो. भुईकोट
किल्याभोवती खंदक खोदून एकप्रकारे किल्ल्याला संरक्षीत केले जाते. शत्रूला सहजपणे किल्ल्याला भिडता येऊ नये या साठी केलेली ही खास योजना, खंदकामध्ये पाणी, मगरी, साप असे प्राणी सोडले जात, जेणेकरुन एक-प्रकारे भुईकोट किल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते. खंदकावरून जाण्यायेण्यासाठी काढता घालता येणारा पूल बसविला जाई. उदा:किल्ले चाकण , यशवंतगड इ.

64) तळखडे – गडावरील लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने गडावर घरांचे, वाड्यांचे बांधकाम केले जाई. यासाठी प्रामुख्याने दगड, लाकूड आणि विटा यांचा वापर केला जात असे. घराच्या, वाड्याच्या दगडी चौथ-यावर उभे लाकडी खांब व त्यावर इतर बांधकाम अशी रचना असे. आज गडावरील या अवशेष रूपी घरांच्या चौथ-यावर आपल्याला विशिष्ट् प्रकारचे दगड किंवा खुणा दिसतात, यांना तळखडे असे म्हणतात. वाडा बांधताना या विशिष्ट आकाराच्या कोरलेल्या नक्षीदार दगडावर,तळखड्यांवर वाड्याचे लाकडी खांब रोवले जात, उभे केले जात. यामुळे या लाकडी खाबांना एकप्रकारे ओल, किड इ. गोष्टींपासून संरक्षण मिळे.

गडावर असणा-या या सर्व महत्त्वाच्या बाबी,गडाचे हे दुर्गावशेष, गडाला एक गडाचे परिपूर्ण रूप देतात…….

शिवदुर्गबांधनीतील अनेक प्रयोग आजही आपल्याला अचंबित करतात.गडकोट पाहता पाहता हे दुर्गावशेष अभ्यासले तर या गडांची परिपूर्ण भटकंती नक्कीच होईल.

-आंतरजालावरुन साभार 🙏

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...