श्री चिंतामणी विनायक मंदिर , थेऊर
थेऊरच्या चिंतामणीबद्दल असे सांगितले जाते की ॐकारस्वरूपाने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि त्याच्यावर सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली. ब्रह्मदेव कार्य करू लागला, परंतु त्याच्या मनात माझ्याशिवाय कोणाचे काहीही चालणार नाही, असा अहंभाव निर्माण झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या हातून सृष्टिनिर्मितीच्या कार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ब्रह्मदेवाच्या चित्ताला काम-क्रोध-लोभ-मोह-मद आणि मत्सर हे षड्रिपू त्रास देऊ लागले आणि ब्रह्मदेवाचे चित्त अस्थिर झाले, त्या वेळी देवर्षी नारदांनी चिंतामणी गणेशाची उपासना करावयास सांगितली. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक या चित्ताच्या पाच भूमिका असून, त्यांना प्रकाशमान करणारा चिंतामणी असतो. त्याच्या आराधनेने चित्ताच्या या पाच अवस्था नष्ट पावून शांती प्राप्त होते. म्हणून नारदाने ब्रह्मदेवाला अर्धागिनीसमवेत ओंकाराची तपश्चर्या करण्यास सांगितले.
नजीकच्या काळात ब्रह्मदेवाने मुळा-मुठा नदीच्या पात्रात एका पायावर उभे राहून ॐकाराची उग्र अनुष्ठाने केली. ॐकारदेव ब्रह्मदेवाला प्रसन्न झाले आणि त्याने त्याला आशीर्वाद दिले. पुढे ब्रह्मदेवाने या क्षेत्री मोठय़ा थाटामाटात, सर्व देवांच्या उपस्थितीत, गणेशाच्या मूर्तीची यथासांग प्रतिष्ठापना केली आणि त्याच्या गळय़ात मोठय़ा भक्तिभावाने चिंतामणी रत्नांचा हार घालून ‘चिंतामणी’ असे त्याचे नामकरण केले.
ब्रह्मदेवाच्या चित्ताला येथे स्थावरता म्हणजे स्थिरता प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला ‘स्थावर’ असे नाव पडले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन ‘थेऊर’ असे नाव रूढ झाले. या क्षेत्री गाणपत्य मुनी, कौंडिण्य हेही येथे राहून, त्यांनी ‘चिंतामणी’ गणेशाची उपासना, एक लक्ष दूर्वा वाहून केली. चिंचवडचे महान गाणपत्य साधू मोरया गोसावी यांनी येथील अरण्यात चिंतामणीचे खूप मोठे तप केले होते, तेव्हा चिंतामणीने त्यांना व्याघ्ररूपात दर्शन दिले होते. श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणीमहाराज यांना येथील मंदिर बांधलेले आहे.
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी येथील सभामंडप बांधला आणि मंदिराचा विस्तार केला. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी याच मंदिरात त्यांची प्राणज्योत मालवली. चिंतामणीच्या पायांपाशी आपला देहान्त व्हावा म्हणून, देहान्ताच्या अगोदर त्यांनी दहा हजार रुपये किमतीचा रत्नांचा हार चिंतामणीच्या गळय़ात घालून त्याची पूजा केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रमाबाई येथे सती गेल्या होत्या. मुळा-मुठा नदीच्या तीरावर त्या जागी एक वृंदावन बांधले आहे. दरवर्षी येथे कार्तिक वद्य अष्टमीला रमा-माधव स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो. चिमाजीआप्पांनी वसईच्या मोहिमेतून जिंकून आणलेली एक मोठी घंटा देवळाच्या सभामंडपात बांधलेली आहे. हे क्षेत्र ‘प्राजापत्य’ या क्षेत्रप्रकारात मोडते.
Comments
Post a Comment