महात्मा फुले मंडई , पुणे
" पुणे तिथे काय उणे " ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे.
मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी " भव्य " कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामाला लागले. ते त्यांनी अडीच-तीन वर्षांत पूर्ण केले. उंच टॉवर असणारी अष्टकोनी मंडई उभारण्यास तीन लाख रुपये खर्च झाला.
मंडईचे काम पूर्ण होताच तिचे उदघाटन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर " लॉर्ड रे " यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 1886 रोजी थाटामाटात झाले. तेव्हा साहजिकच मंडईला " रे मार्केट " असे नाव देण्यात आले. पण पुढे काळ बदलला, तशी 1940 साली आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून लॉर्ड रे यांच्या ऐवजी " महात्मा फुले मंडई "असे उचित नाव ठेवायला लावले. आचार्य अत्रे त्यावेळी नगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मंडईच्या वरच्या बाजूला " लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम " होते. नगरपालिकेची कार्यालयेही तिथेच होती. तत्पूर्वी नगरपालिका रास्ता पेठेत एका जुन्या वाड्यात दोन खोल्यामध्ये होती!
माहिती आभार : म.श्री.दीक्षित ✍
Comments
Post a Comment