सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक वा कृत्रिम रीत्या झालेल्या जलसंचयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादींच्या बांधकामाने वास्तुदृष्ट्या जे आकर्षक स्वरूप दिले जाते, त्यास तलाव म्हणतात. तलाव हे आकारमानाने सामान्यतः सरोवरापेक्षा लहान व विहिरीपेक्षा मोठे असतात. तलावाला, ताल, तालाब, तडाग, पुष्करणी, वापी, वापिका अशी भिन्नभिन्न नावे आहेत. यांपैकी काही नावे वैशिष्ट्यनिदर्शक आहेत. उदा : पुष्करणी म्हणजे कमळांचे तळे. यात पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या होत्या. जुन्या काळी अशा तलाव बांधण्याची पद्धत होती.
तलावाचा उपयोग गावास पाणीपुरवठा, देवळास शोभा, धार्मिक कार्ये, अग्निशमन, सृष्टिशोभा, पांथस्थाची सोय अशा अनेक कारणांनी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तलावाचे बांधकाम दगडी करून तलावातील पाण्याचे शोषण कमी करता येते. ज्या भागांत मोठ्या नद्या कमी; तिथे देवळाच्या प्राकारात तलाव बांधीत असत. या तलावांकाठी घाट, दीपमाळा, ओवऱ्या, स्तंभावल्या, महाद्वारे इ. बांधण्याची प्रथा होती.
सार्वजनिक उपयोगासाठी तलाव बांधणे, हे धर्मशास्त्रानुसार पुण्यपद मानले गेले आहे. असे तलाव बांधून ते सार्वजनिक कार्यासाठी अर्पण करण्याचा ‘तडागोत्सर्ग’ हा एक प्राचीन धार्मिक विधी होता. मत्स्यपुराण, नारदपुराण आदी पुराणांमध्ये या विधीविषयी वर्णन आढळते. या विधीचाच एक भाग म्हणून सोन्याचे मासे, कासव वगैरे करून ते तलावात सोडावेत, असे म्हटले आहे. अशा स्वरूपाचे विवेचन महानिर्वाणतंत्र (अठरावे शतक) या ग्रंथात आढळते. भुवनदेवकृत अपराजितपृच्छा (बारावे–तेरावे शतक) या ग्रंथात तलावांचे सहा प्रकार मानले आहेत; ते असे : (१) अर्धचंद्राकृती ‘सर’, (२) गोलाकार ‘महासर’, (३) चौकोनी ‘भद्रक’, (४) भद्रक एकमेकांना जोडून बनलेले ते ‘सुभद्र’, (५) ज्या तलावांत बगळे उतरतात ते ‘परिघ’ व (६) दोन परिघ एकमेकांना जोडलेले ते ‘युग्मपरिघ’.
सन्दर्भ : https://mr.vikaspedia.in/ 🙏
Comments
Post a Comment