श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे / Shree Siddhivinayak Ganpati Mandir, Sarasbaug - Pune
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे
पुणे शहर, पेशवे, आणि श्रीगणेश यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. नानासाहेब पेशवे म्हणजे पुणे शहराचे शिल्पकार. त्यांनी वाढत्या पुणे शहराची नियोजनबद्ध वाढ व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भरपूर मेहनत घेतली. त्यांनी इ.स. १७५५ ला पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्यावर दगडी धरण बांधून २५ एकर क्षेत्राचे मोठे तळे बांधले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. १७ महिने या तळ्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळेस तळे बांधकामास ४,९९, ५५३ रुपये इतका खर्च आला होता. 'पर्वतीचे तळे' म्हणून हे तळे प्रसिद्ध होते. तळ्याच्या भोवती हिराबाग, लोटणबाग सारख्या बागा निर्माण केल्या गेल्या. या नयनरम्य परिसरातील तळ्यात पेशवे नौकाविहार करण्यासाठी येत. अशीच एक तळ्यात छोटे बेट राखून तिथे त्यांनी एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. बागेचे नाव सारस नावाच्या पक्ष्यावरून 'सारसबाग' ठेवले गेले.
थोरले बाजीराव पुत्र नानासाहेब पेशवे (पेशवेपदावरील कारकीर्द - १७४० ते १७६१) यांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या नातवाने म्हणजेच श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी इ.स. १७८४ मध्ये एक दगडी मंदिर बांधले. तेथे उजव्या सोंडेच्या संगमरवरी गणेशाची स्थापना केली. ह्या सिद्धिविनायकाचे मंदिर तळ्यात असल्याने त्याचे नाव तळ्यातला गणपती असे रूढ झाले. अगदी आत्ताआत्तापर्यंत हे ठिकाण याच नावाने ओळखले जायचे. सध्याची आपण जी गणपतीची मूर्ती बघतो, ती स्थापनेपासूनची तिसरी मूर्ती आहे. गणपतीची मूळ मूर्ती १८८२ साली बदलण्यात आली. आज जी मूर्ती दिसते १९९० मध्ये बसविण्यात आली आहे. कमळावर बसलेली चतुर्भुज संगमरवरी गणेशमूर्ती येथे आहे. खालील उजव्या हातात माळ व डाव्या हातात मोदक आणि वरील दोन हातात शस्त्रे आहेत.
सवाई माधवराव पेशव्यांनी बांधलेले मंदिर आज अस्तित्वात नाही. ते १९३० पर्यंत होते. ३ डिसेंबर १९६९ साली नवीन मंदीराचा कोनशिला समारंभ पार पडला. गणपतीचे सध्याचे लाल दगडातले मंदिर हे इ.स. १९७७ साली बांधले आहे. पेशवाईनंतर आकाराने खूप मोठे असलेले पर्वतीचे तळे राहिले नाही. हा भाग दलदलीने भरून गेला होता. तेथे झोपड्यांचा प्रश्नही निर्माण झाला होता. पुढे पुणे महानगरपालिकेने तळ्याच्या जागेवर बाग तयार केली. पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील एक प्रसिद्ध आयुक्त म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे भुजंगराव कुलकर्णी (कारकीर्द सन १९६५ ते १९६९). त्यांच्या काळात मध्ये सारसबाग उद्यानाची निर्मिती झाली व येथे लोकांची वर्दळ सुरु झाली. एकेकाळी या परिसरात कोणी फिरकायचे नाही. बागेस "सारसबाग" असे विस्मरणात गेलेले जुने नाव दिले.
आजही जुन्या लोकांच्या तोंडी 'तळ्यातला गणपती' असेच नाव आहे. हिवाळ्यात बाप्पांचे टोपी व स्वेटर मधील रूप पाहण्यासारखे असते. पुणेकरांना सारसबागेची आठवण मात्र दिवाळीतच होते, असे म्हणावे लागेल. या मंदिराची व्यवस्था श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्याकडे आहे. पुणे शहराच्या वैभवात या गणपतीने व बागेमुळे मोठी भर पडली आहे.
सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Location :
Instagram :
Comments
Post a Comment