श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे / Shree Parvati Nandan Ganpati ( Khinditala Ganapti ), Chattushringi - Pune
गणेशखिंडीत 'पार्वतीनंदन गणपती' किंवा 'खिंडीतला गणपती' हे एक प्राचीन देवस्थान आहे. गणपती खिंडीत असल्याने कदाचित त्याला खिंडीतील गणपती असे नाव पडले असावे. सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रस्त्याला ( गणेशखिंड रस्ता ) जेथे मिळतो तेथे हे मंदिर आहे. मंदिरास दगडी गाभारा, दगडी मंडप व लाकडी सभामंडप आहे. मंदिरात दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात २०-२५ माणसे मावतील एवढी जागा आहे. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे.
सुमारे ४०० वर्षांपासून गणपती अस्तित्वात होता असे म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाणला असलेल्या सोमेश्वर मंदिरात जात असताना इथे विसावल्या होत्या. तेव्हा येथील एका ठकार नावाच्या ब्राह्मणास दृष्टांत झाला की कसब्यात मी ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली आहे. उत्खनन करून तेथे गजाननाचा स्वयंभू तांदळा मिळाला. राजमाता जिजाऊ यांनी तेथे मंदिर बांधले. ते मंदिर म्हणजेच ग्रामदेव कसबा गणपती मंदिर. या मंदिरात साक्षात्कार झाल्यामुळे जिजाऊंनी कसबा गणपती मंदिर बांधले, असे सांगितले जाते. त्यांनी येथे विहीर खणून धर्मशाळा बांधली होती असे समजते.
पुढे पेशवाईत सिध्दपुरुष शिवरामभट चित्राव येथे पाषाणला वास्तव्यास होते. त्यांना मंदिराची दैन्यावस्था दिसून आली. म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार व विहिरीची साफसफाई करताना त्यांना विहिरीत गुप्तधन सापडले. हे गुप्तधन सरकार दरबारी घेण्यास पहिल्या बाजीराव पेशव्यांनी नकार दिला. म्हणून गुप्तधनातून या मंदिराचा जीर्णोद्धार व शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर उभारण्यात उपयोग झाला, अशीही एक आख्यायिका आहे. श्रीमंत पेशवे मोहिमेवर जाताना येथील गणपतीचे दर्शन घेत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आहे...
गणपतीचे उल्लेख इंग्रजांच्या काळातही मिळतात. तेव्हा हा भाग शहराच्या वस्तीपासून लांबवर होता. त्यामुळे चापेकर बंधूंनी व सेनापती बापट यांनी ही जागा वापरली होती. अत्याचारी रँडची हत्या केल्यावर दामोदर चापेकरांनी त्यांचे सहकारी खंडेराव साठे यांच्यामार्फत 'खिंडीतला गणपती नवसाला पावला' असा सांकेतिक निरोप लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सर्व प्रांताचे व्यापारी पुण्यात येताना येथील रम्य परिसरात मुक्काम करीत असत. प्रसिद्ध असलेल्या ५६ विनायकांपैकी हा ५५वा विनायक होय.
१८८४ मध्ये रत्नागिरीच्या महादेव बर्वे यांनी सभामंडप दुरुस्त केल्याची नोंद आहे. चतश्रुंगी मंदिरापासून जवळ असलेल्या या मंदिराच्या पुनरुज्जीवनाची गरज निर्माण झाली.तेव्हा मंदिर संवर्धनाचे काम बाभळे गुरुजी व 'किमया'च्या कलमदानी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या कामाची तपशीलवार माहिती २०१५ मध्ये युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कारासाठी पाठविण्यात आली. आणि पुरातन वास्तू जतनासंबंधीचा यूनेस्कोचा पुरस्कार या मंदिरास मिळाला. मंदिर ऐतिहासिक असूनही येथे गणेशभक्तांची पावले फारशी वळत नाहीत. त्यामुळे हे एक दुर्लक्षित वारसास्थळ आहे. बाभळे हे मंदिराची व्यवस्था पाहतात.
सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Location :
Instagram :
Comments
Post a Comment