Skip to main content

Samarbhumi Umbarkhind / समरभूमी उंबरखिंड


समरभूमी उंबरखिंड 

शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीचा फाटा लागतो, या फाट्यापासून गाडीने ४ किमी आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड स्मारक आहे.

इतिहास :

इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता.

खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.

खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. फौज दुपारपर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली.

जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असतांना महाराजांच्या सैन्याने अचानक मोघली सैन्यावर हल्ला केला. बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.

अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहीत्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सैन्य रिकाम्या हातानी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले.

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...