स्थळ: जंगली महाराज रस्ता , शिवाजीनगर , पुणे शहर
चित्र क्रमांक १ : श्री जंगली महाराज प्रवेशद्वार
चित्र क्रमांक २ : श्री जंगली महाराज समाधी, ध्वजस्तंभ
जंगलीमहाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे. जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास बारा वर्षे संशोधन करून बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागांत गेले, जंगलीमहाराजांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली.
मंदिर परिसर: पुण्यनगरीत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व अग्रगण्य स्थान आहे. जिमखान्यावरून निघालेल्या ८० फुटी प्रशस्त रस्त्याच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या अलीकडील विस्तीर्ण चौकाच्या थोड्या अलीकडे डाव्या हाताला थोड्याशा उंचवट्यावरील गर्द झाडीत हे स्थान असून जवळच पांडव लेणी उर्फ पाताळेश्वर लेणी ही गुंफाही आहे. नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो.
पटांगणात डाव्या बाजूला जवळ जवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून भगवा ध्वज सदैव फडकत असतो. मंडप हंड्या, झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण टुमदार अशी समाधी आहे. ती त्यांच्या गुरुंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे. नगाऱ्याच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात.
मंडपाच्या आतील बाजूस दोन-तीन पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळ जवळ नऊ-दहा फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे. वास्तविक ते तैलचित्र नसून प्रत्यक्ष महाराजच उभे आहेत असा नुसता भास नव्हे तर साक्षात्कार होतो.
ध्वजस्तंभ: सद्गुरू श्रीजंगलीमहाराज यांचे मंदिरात प्रवेशद्वारातून सतरा-अठरा पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या हाताला ‘ध्वजस्तंभ’ आहे. जवळ जवळ पाच फूट उंचीच्या षटकोनी सिमेंटच्या चौथऱ्यावर दोन फूट उंचीच्या कमलाकृतीत सध्याचा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला असून सोन्याचे पॉलिश केलेला कळस बसविलेल्या ह्या स्तंभाची उंची जवळ जवळ पंचाहत्तर फूट आहे. त्याठिकाणी भगवा ध्वज सदैव फडकत असतो.
आज आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो. दर्शन करून पावन होऊ शकतो. पण पाऊणशे वर्षापूर्वी तेथे काय होते? ते शिवाजीनगरही नव्हते आणि शनिवारवाड्यासमोरचा आज आहे तसा नवा पूलही नव्हता. नदीच्या पलीकडे होत्या पेरूच्या बागा, फुलांचे ताटवे, बोरी बाभळीची वने आणि निवडुंगाचे आगर. मनुष्यवस्ती जवळजवळ नसलेली अशी एक निर्जन जागा. पण त्याच जागेवर श्री जंगली महाराज हाच एक चमत्कार घडला.
माहीती आभार : अन्तरजाल ✍
Comments
Post a Comment