घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे
छत्रपती शिवाजी पूल म्हणजे नव्या पुलावरून पूर्वेच्या बाजूला खाली नदीपात्रात डोकावून पाहिले, तर खणखणीत चिरेबंदी बांधकाम आणि त्यांच्या रेखीव पायऱ्या असे स्थापत्य ठळकपणे नजरेत भरते. अगदी नदीतील पाण्याच्या प्रवाहाजवळ हे बांधकाम नेमके कसलं ? तर याचं उत्तर आहे - ' घोरपडे घाट ' !
पेशव्यांचे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज असणाऱ्या दौलतराव घोरपडे यांनी १८२१ मध्ये चार बुरुजांसह भक्कम संरक्षक भिंत, नगारखान्यासह प्रवेशद्वार, नदीच्या थेट प्रवाहापर्यंत जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या असा एक घाट बांधून घेतला. या दक्षिणाभिमुखी वास्तुरचनेच्या बुरुजांना जोडणाऱ्या भिंतीमध्ये दोन्ही बाजूंना दोन खोल्या आहेत. भिंतीवर देवड्या आहेत. इथून मुठेपर्यंत जाणाऱ्या सुबक प्रमाणशीर पायऱ्यांची रचना देखणी आहे.
पानशेत प्रलयाच्या आपत्तीत या घाटाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी कोसळले. तेथे एक शिलालेख होता. तोही स्थानभ्रष्ट झाला. ' श्री येशवंत चरणितत्पर दवलवराव व पिराजीराव घोरपडे, अमिरुळ उमरा व शंबेसी निरंतर, शके १७५३ विक्रमनाम स्मशेर ( संवत्सरे ) फाल्गुन शु पंचमी रमज्यान ' असा मजकूर त्या शिलालेखात होता. फिरंगी कालगणनेप्रमाणे तो दिवस १० फेब्रुवारी १८३१, गुरुवार असा येतो. सध्या जरी या घोरपडे घाटावरचे बांधकाम कोसळले असले, तरी दोन मंदिरांच्या जोत्याचे भाग दिसू शकतात. कदाचित भांबुर्डे गावासंबंधीच ' श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर ' असे उल्लेख मिळतात. तेच हे सांबाचे देऊळ असावे. दुसरे एक राऊळ येथे आहे. ते कदाचित घोरपडे घराण्यातील एखाद्या महनीय व्यक्तीचे स्मारक-वृंदावन असू शकेल.
पनशेत प्रलयाच्या तडाख्यात इथला सारा परिसर अगदी उद्ध्वस्त होऊन गेला. जवळचा शिवाजी तलाव ( पोहायचा तलाव ), शिवाजी उद्यान हे सारे लुप्त होऊन गेले. नदीच्या काठावर शंभर फुटी रस्ता झाला. त्या रस्त्यावरच ' मनपा बसस्थानक ' थाटले गेले. पुणे महानगरपालिकेची नव्या ढंगातील आकर्षक इमारत रस्त्यापल्याड साकारली गेली.
पुण्याचा सर्वांगीण विकास होतो आहे. त्यामध्ये शहरातील जुन्या काळच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत. घोरपडे घाटासारख्या देखण्या वास्तूची उपेक्षा न करिता, इथले वास्तू-अवशेष तसेच राखूनही हा भाग सुशोभित करणे अशक्य नाही. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक दबाव हवेत !
माहिती आभार :
वारसा प्रसारक मंडळी
( discovermh संकेतस्थळ )
Instagram - @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment