नाना फडणवीस
१४ जानेवारी १७६१ ला पानिपतावर झालेली निर्णायक लढाई. पेशवे घराण्याचे दोन महत्त्वाचे वंशज त्यादिवशी कामी आले होते. अनेक सरदारांनी, सैनिकांनी आता अंत जवळ येतोय हे दिसल्यावर आपापल्या वाटा धरल्या होत्या. तिथून बाहेर पडणाऱ्यांमध्ये एक विशीच्या आतबाहेर वय असणारा तरुणही होता. कसाबसा लपत-छपत जीव वाचवून या तरुणानं पेशव्यांची बुऱ्हाणपूर येथे भेट घेतली. पेशव्यांना सगळा वृत्तांत सांगितला. पुढच्या काळात हा तरुण मराठा साम्राज्यात महत्त्वाचं स्थान मिळवणार होता. हा तरुण म्हणजेच बाळाजी जनार्दन भानू...अर्थात "नाना फडणवीस".
जनार्दन फडणवीस आणि रखमाबाई यांच्यापोटी जन्मास आलेले बाळाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणवीस होय. नाना फडणवीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. राघोबा दादांबरोबर उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेत जनार्दन फडणवीस यांचं निधन झाला. अत्यंत हुशार तल्लखबुद्धीच्या नाना फडणवीसांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर १७५६ साली फडणवीशी मिळाली.
नाना फडणवीस हे नाव गेल्या तीनशे वर्षांमध्ये अनेकवेळा अनेक कारणांनी वापरलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या मृत्यूनंतरही इतकी वर्षे वापरलं जाण्याची उदाहरणं फार कमी असतात. त्यांच्या अनेक चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखी नाट्यमय वाटते. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर मराठा साम्राज्यातलं त्यांचं महत्त्वाचं स्थान उमगतं.
पेशवाईमध्येही ज्या चार असामान्य व्यक्तिमत्त्वांनी आपली छाप उमटवली, त्यांना "साडेतीन शहाणे" असं नाव मिळालं. या चार जणांमध्ये सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर यांच्यासोबत नाना फडणवीस यांचाही समावेश होता.
नाना फडणवीसाचं भानू घराणं आणि पेशव्याचं भट घराणं यांचा संबंध अनेक वर्षांपासूनचा आणि पिढ्यांचा होता. बाणकोटच्या खाडी या दोन्ही घराण्यांशी संबंधित आहे. खाडीच्या उत्तरेस भट घराण्याचं श्रीवर्धन आणि दक्षिणेस भानू घराण्याचं वेळास. वासुदेवशास्त्री खरे यांनी नाना फडणवीसांचे जे चरित्र लिहिले आहे त्यात बरेच घटनेंचा उल्लेख आहे.
माहिती आभार :
ओंकार करंबेळकर
( बीबीसी प्रतिनिधी )
टीप - पोस्टमधील छायाचित्र ( मूर्ती आणि तसबीर ) ही वेळास ( महाराष्ट्र ) येथील आहे.
Comments
Post a Comment