१९८३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी मूर्ती करण्याचे ठरविले, तेव्हा मंडळाचे पुरोहित श्रीकांत काळे यांनी सांगितले, की पुराणात सांगितल्याप्रमाणे मूर्ती केली पाहिजे. त्यानुसार यशवंत वासुळकर, विजय सोमवंशी, वसंत पठारे आदींनी वेदाचार्य घैसास गुरुजींची भेट घेतली. गुरुजींनी पेणच्या मधुकर भोईर यांचे नाव सुचविले; तसेच मूर्तीचे काम सूर्योदय ते सूर्यास्त याच काळात केले जावे असे सुचविले. त्यानुसार मूर्तीची छोटी प्रतिकृती करण्यात आली. ती पसंत पडल्यावर सध्याची मूर्ती करण्यात आली. हे काम एक वर्ष सुरू होते.
१९८४ मध्ये वेदाचार्य घैसास गुरुजींच्या हस्तेच विधिवत यंत्र बसवून, मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मूर्ती शाडूची असून, गणेश व रिद्धी सिद्धी आसनावर बसलेल्या आहेत. गणपतीच्या उजव्या हातांमध्ये त्रिशुळ, परशू आणि कमळ आहे. येथे आशीर्वादाच्या हाताची रचना नाही. गणपतीचे रिद्धी- सिद्धींसोबतचे हे रूप अतिशय विलोभनीय आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपती आपले मन मोहून टाकतो. पुण्यात गणपतीच्या अनेक मूर्ती आहेत; पण केवळ याच मूर्तीच्या पायात खडावा दिसतात. या मूर्तीचा निर्माण कार्य प्रसिद्ध मूर्तिकार पार्सेकर यांनी केली आहे.
गणेश पुराणानुसार रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या कन्या, तर शिवपुराणानुसार त्या विश्वरूप प्रजापतीच्या कन्या. शंकर आणि पार्वती गणेशाचे लग्न करणार आहेत, असे कळल्यावर विश्वरूप प्रजापतीने आपल्या दोन सुंदर कन्या गणेशास देण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानुसार त्यांचे गणपतीशी लग्न झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ असे दोन पुत्र गणपतीस झाले.
ठिकाण - रिद्धी सिद्धी गणपती, नागनाथ पार मित्र मंडळ, सदाशिव पेठ - पुणे
माहिती आभार :
- मंदार लवाटे ( महाराष्ट्रटाइम्स )
- मंगेश डाळिंबकर ( मंडळ अध्यक्ष )
रिद्धी सिद्धी गणपती
पुण्यातील रिद्धी आणि सिद्धीसह असलेली गणपतीची मूर्ती नागनाथ पार मित्र मंडळाकडे आहे. ही सुरेख मूर्ती सदाशिव पेठेत असून, प्रसिद्ध आहे. नागनाथ पार मंडळ अगदी सुरुवातीच्या काळातील मंडळांपैकी एक ! नरहरी शेठ वासुळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. बरीच वर्षे येथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती बसविल्या जात असत. मोरावर बसलेला, कॅरम खेळणाऱ्या अशा विविध मूर्ती मंडळाने बसविल्या होत्या.
Comments
Post a Comment