सासवड येथे संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख एक छोटीशी घुमटी आहे. ही घुमटी म्हणजे पराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी होय. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे.
सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.
शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. आदिलशाहीचा सरदार फत्तेखान हा २०००० फौज घेऊन शिवाजी राजांवर चालून आला. त्याने सुभानमंगळ जिंकून नंतर पुरंदर वर हल्ला केला. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचाहा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप यांसारखी स्वराज्यनिष्ठ मंडळी बेलसरच्या छावणीवर गेली. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. याच वेळी बाजी पासलकर यांना वीर मरण आलं.
त्यामुळे चवताळून गोदाजी जगताप यांनी फत्तेखानाचा सरदार मुसेखान याला गाठला आणि सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. गोदाजीचा रौद्र पराक्रम पाहून फत्तेखान विजापूरला घाबरून पळून गेला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला. याच्या नंतर मात्र गोदाजी जगताप यांचा इतिहासात उल्लेख सापडत नाही. त्यांचा मृत्यू कधी झाला याची देखील नोंद इतिहासात सापडत नाही.
आभार :
- विनयश श्रीकांत भोसले
Instagram : @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment