रास्ते वाडा, सोमवार पेठ ( पुणे ) दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशनकडे जाताना थोडे पुढे गेल्यावर समोरच एक भव्य वाडा दिसतो. हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तेथपासून अपोलो टॉकीजच्या चौकापर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील प्रमुख सरदार आनंदराव रास्ते यांचा हा वाडा. सध्या वाड्याच्या दर्शनी भागात तळमजल्यावर काही दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शाळेची पाटी दिसते. पेशवाई जाऊन शतके उलटली, सरंजामतनखा जाऊनही दशके उलटली. त्यामुळे रास्ते सरदारांच्या वंशजांना बदलत्या काळाबरोबर बदलणे भाग पडले. साहजिकच त्यांनी वाड्याच्या दक्षिणेकडील बाजूस म्हणजे अपोलोकडून के.ई.एम. कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस ओनरशिप फ्लॅट उठविले. पुणे शहराच्या पूर्व भागातील या वाड्याला पूर्वीच्या काळी आंबील ओढा वळवून पाणीपुरवठा केलेला होता. वाड्याच्या आत सरदार रास्त्यांनी बांधलेले श्रीरामाचे सुरेख देऊळ आहे. हाच ' रास्त्यांचा राम '. वाड्याप्रमाणेच रास्ते घराण्याचा इतिहासही पाहण्...